ब्रेकिंग न्यूज

महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याच्या तारा चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, गुन्हे शाखा ७ ची कारवाई

Share

पुणे- पुणे शहरालगतच्या ग्रामीण भागातील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरणार्‍या आतंरराज्य टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील तिघांना पकडून पोलिसांनी ६ गुन्हे उघडकीस आणून १२ लाख ७३ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट ७ च्या पथकाने केली.

मोहम्मद साहेबजान मंगेरखान (वय ३०), आदर्श चंद्रप्रकाश पांडे (वय २२), चंद्रसेन शिवरतन धारिया (वय २८, तिघे सध्या रा. गोटेमाळ, सासवड, जि. पुरंदर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत.

पुणे शहरालगत असलेल्या वाघोली, लोणीकंद परिसरातील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरून नेण्याच्या घटना घडल्या होत्या. गुन्हे शाखा युनिट ७ चे पोलीस अंमलदार विनायक साळवे यांना गस्त घालत असताना बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की वाडेगाव ता. हवेली जि. पुणे येथे काही ट्रान्सफॉर्मर चोरी करणारे इसम येणार आहेत. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार वाडेगाव येथे सापळा रचून एका संशयित मालवाहू टेम्पो क्र. एमएच १२ जीटी ६६७५ सह तिघांना ताब्यात घेण्यात आले.

मागील ५ ते ६ महिन्यात लोणीकंद परिसरातील वाडेगाव, आष्टापूर, सांगवी सांडस, न्हावी सांडस व हिंगणगाव येथून एकूण ८ ट्रान्सफॉर्मर, रोहित्रामधील तांब्याच्या तारा चोरी केल्याचे आरोपींनी कबूल केले. त्यांना ६ सप्टेंबर रोजी अटक करुन त्यांच्याकडून १२ लाख ७३ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार विनायक साळवे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, भरत उर्किडे, अमोल ढोणे, विकास कदम, निर्णय लांडे, गिरीश नाणेकर, सुहास तांबेकर, किरण पलांडे, नेहा तापकीर, बाळासाहेब तनपुरे, समाधान पाटील, भरत गुंडवाड,प्रतीक्षा पानसरे, सोनाली नरवडे यांनी केली.