पुणे- प्रत्येक साऊंडमध्ये ६ प्रेशर मिड वापरणार्या गणेश पेठेतील पांगुळआळी दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष व साऊंड सिस्टिम मालकावर फरासखाना पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. २ लाख रुपयांचे ४ टॉप साऊंड पोलिसांनी जप्त केले आहेत.
विजय सुरेश सुतार (वय ४०, रा. पांगुळ आळी, गणेश पेठ), रिच ऑडिओ सिस्टीमचे मालक नरसिंह राम रेड्डी (वय ३२, रा. नवी सांगवी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार संदीप गणपत धनवटे (वय ४०) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश पेठेतील पांगुळआळी चौक येथे शनिवारी दुपारी चार वाजता ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व दहीहंडी उत्सव मंडळांना डी जे साऊंड सिस्टीम, प्लाझ्मा, प्रेशर मिड साऊंड सिस्टिम तसेच लेजर लाईट, फटाके न वापरण्याबाबत सूचना दिल्या होत्या. दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने दहीहंडी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच दुपारी सहायक पोलीस निरीक्षक लोणकर, पोलीस हवालदार दुधाळ, होमगार्ड शर्मा इत्यादी पेट्रोलिंग करत पांगुळआळी येथे आले असता त्याठिकाणी चार बेस व चार टॉप अशी साऊंड सिस्टिम लावल्याचे आढळून आले.
पोलिसांना संशय आल्याने साऊंड सिस्टीमच्या मालकाला बोलविण्यात आले. रिच ऑडिओ सिस्टीमचे मालक नरसिंह रेड्डी यांनी चार टॉपमध्ये प्रत्येकी २ प्रेशर मिड लावण्यात आले असल्याचे सांगून ते सध्या बंद करुन ठेवण्यात आले असल्याचे सांगितले. त्यातील एक टॉप खोलून त्यातील प्रेशर मिड दाखविला असता त्याची संख्या ६ असून ते साऊंड सिस्टीममधील आवाज जास्त प्रमाणात वाढविण्याचे काम करत असल्याची माहिती दिली.
प्रेशर मिड वापरण्यास मनाई असताना त्यांनी त्याचा वापर केल्याने पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष विजय सुतार आणि नरसिंह रेड्डी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन हे प्रेशर मिड वापरलेले ४ ही टॉप जप्त केले.
