एम आय टी शैक्षणिक संकुलातील लिफ्टमध्ये विद्यार्थिनी १४ तास अडकली

लोणी काळभोर- १९ वर्षीय विद्यार्थिनी तब्बल १४ तास लिफ्टमध्ये अडकून पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी विद्यापीठात हा प्रकार घडला. तब्बल १४ तास विद्यार्थिनीचा जीव धोक्यात असताना विद्यापीठाच्या सुरक्षा यंत्रणेला याचा थांगपत्ताही न लागल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
घटना अशी घडली….
बुधवारी (१८ नोव्हेंबर) दुपारी साडेतीन वाजता महाविद्यालय सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी ही विद्यार्थिनी लिफ्टमधून खाली येत असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि लिफ्ट पाचव्या व सहाव्या मजल्यादरम्यान बंद पडली. संपूर्ण रात्र अन्न-पाण्याविना आणि अंधारात काढल्यानंतर गुरुवारी (१९ नोव्हेंबर) पहाटे सहाच्या सुमारास तिची सुटका झाली.
या घटनेदरम्यान विद्यार्थिनीने लिफ्टचा दरवाजा ठोठावून आरडाओरडा केला, मात्र तिच्या मदतीला कोणीही आले नाही. तिने मोबाईलवरून पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता केवळ ‘हॅलो’ इतकाच आवाज गेला आणि सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तिचा फोनही बंद झाला.
दुसरीकडे, वाघोली येथे राहणाऱ्या पालकांनी लोणी काळभोर गाठून सर्वत्र शोधाशोध केली व अखेर मध्यरात्री लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास विद्युतपुरवठा पूर्ववत झाला. त्यानंतर एका महिलेने लिफ्टचे बटण दाबताच लिफ्ट सुरू झाली आणि तब्बल १४ तासांपासून आत अडकलेल्या विद्यार्थिनीची सुटका झाली. मुलगी सुखरूप असल्याचे समजताच पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी आकारणाऱ्या नामांकित संस्थेत तब्बल १४ तास विद्यार्थिनीचा जीव धोक्यात असताना विद्यापीठाच्या सुरक्षा यंत्रणेला याचा थांगपत्ताही कसा लागला नाही? लिफ्टमधील आपत्कालीन अलार्म, इंटरकॉम, बॅकअप वीजपुरवठा आणि बचाव यंत्रणा कार्यरत होती का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.







