बाईक टॅक्सी विरोधात २३ नोव्हेंबरला रिक्षा चालकांचा संप, आर टी ओ कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन

बाईक टॅक्सी विरोधात २३ नोव्हेंबरला रिक्षा चालकांचा संप, आर टी ओ कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन 
Share

पुणे – अनधिकृत बाइक टॅक्सी सेवा आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीच्या विरोधात राज्यातील रिक्षा चालक मालक संघटना आक्रमक झाल्या असून येत्या २३ तारखेला आंदोलनाची हाक दिली आहे. या दिवशी रिक्षाचालक संपावर जाणार असून आर टी ओ कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 

पुणे जिल्हा रिक्षाचालक-मालक कृती समितीने संपाचा निर्णय घेतला असून, या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर (RTO) बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. संघटनेच्या माहितीनुसार, एकट्या पुण्यात सुमारे दीड लाख रिक्षाचालक-मालक आहेत, तर संपूर्ण महाराष्ट्रात हा आकडा १५ ते २० लाखांच्या आसपास आहे. नियमबाह्यपणे सुरू असलेली बाइक टॅक्सी वाहतूक तात्काळ थांबवावी, अशी प्रमुख मागणी कृती समितीने केली आहे.

अनेक बाइक टॅक्सी कंपन्या शासकीय नियमांचे उल्लंघन करत प्रवाशांची वाहतूक करत असल्याने रिक्षाचालकांच्या उपजीविकेवर संकट ओढवले आहे. पारंपरिक रिक्षा व्यवसाय मोडीत काढण्याचा कट काही खासगी कंपन्यांकडून रचला जात असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. या आंदोलनाचे पडसाद राज्यभरात उमटून इतर भागातील रिक्षाचालकही यात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Vedh News