अन्न व औषध प्रशासनाकडून वायसीएम रुग्णालयातील १ कोटी ९० लाखांचा औषधसाठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाकडून वायसीएम रुग्णालयातील १ कोटी ९० लाखांचा औषधसाठा जप्त
Share

पिंपरी – महापालिकेच्‍या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात जेजुरीमधील कंपनीतून औषधे पुरवली जातात. मात्र, उत्पादनासाठी वैध परवानगी नसल्याने अन्‍न व औषध प्रशासनाने कारवाई केली असून, विविध प्रकारच्या औषधांचा १ कोटी ९० लाख ३३ हजार ४८० रुपयांचा साठा जप्त केला आहे.

जेजुरी एमआयडीसीतील इंडुकेअर फार्मास्युटिकल्स अँड रिसर्च फाउंडेशन या उत्पादक कंपनीचा ‘वायसीएम’मधील तसेच, जेजुरीतील कारखान्यातील औषधसाठा जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ‘वायसीएम’ रुग्णालयातील मध्यवर्ती औषध भांडारातून औषध निरीक्षक एस. एस. बुगाड यांनी औषधांचे नमुने घेतले होते. तपासणीत त्यातील काही औषधे गुणवत्ता मानकांनुसार नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच, काही औषधांच्या उत्पादनासाठी कंपनीकडे वैध उत्पादन परवानगी नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यानुसार कंपनीला नोटीस दिली असून, कायदेशीर कारवाई देखील सुरू केली आहे.

‘वायसीएम’ मेडिकल स्टोअरमधील १ कोटी ७२ लाख ७५ हजार १२६ तर कंपनीच्या कारखान्यातून १७ लाख ५८ हजार ३५४ रुपयांचा साठा जप्त केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. औषधांच्या तपासणीत औषधांचे वर्णन, वजनातील एकरूपता आणि लेबलिंगमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. लवकरच न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे.

औषधांच्या गुणवत्तेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने तातडीने संबंधित औषधांचा साठा तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविण्याची कार्यवाही केली. वायसीएम रुग्णालयात कोणतीही छापेमारी करण्यात आलेली नसून, औषधांची गुणवत्ता पडताळणी करण्यासाठी महापालिकेने स्वतःहून पुढाकार घेतला होता. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित उत्पादक कंपनी व पुरवठादाराविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी दिली आहे.

Vedh News