शिक्षिकेचा भर रस्त्यात खून, आधी वाहनाने धडक, नंतर शस्त्राने वार ; पुरंदर तालुक्यातील घटना

पुणे – शाळेत नोकरीसाठी निघालेल्या एका महिला शिक्षिकेची रस्त्यातच अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आधी मालवाहू कॅरीनं धडक देऊन आणि नंतर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा रस्त्यातच खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील मौजे पांगारे येथे घडली.
उज्ज्वला रामदास काकडे (वय ४७ वर्षे) असे या घटनेत मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. पोलिसांनी शशिकांत माणिकराव काकडे (वय ५१, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) याला अटक केली आहे. याबाबत उज्ज्वला काकडे यांचा भाऊ गणेश दत्तात्रय मेमाणे (वय ३९, रा. हडपसर) यांनी सासवड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उज्ज्वला काकडे यांना एक मुलगी असून त्यांच्या पतीचे यापूर्वीच निधन झालेले आहे. उज्ज्वला या पांगारे येथेच राहत होत्या. तर, हडपसर येथील साधना विद्यालयात त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती रामदास माणिकराव काकडे हे आजारी असताना त्यांचे दीर शशिकांत काकडे याने त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतले होते. रामदास काकडे यांच्या मृत्युनंतरही त्यांचे पैसे, चेक, सोन्याचे दागिने व इतर कागदपत्रे शशिकांत काकडे यांच्याकडे होते. उज्वला काकडे यांनी ते सर्व परत मागितले असता त्यांच्यात वाद होत होता.
घटनेच्या दिवशी उज्ज्वला या नेहमीप्रमाणे नोकरीसाठी पांगारे येथून हडपसरच्या दिशेने निघाल्या होत्या. त्याचवेळी न्यू इंग्लिश स्कूल पांगारेच्या जवळच आरोपीने त्यांना गाठले. आरोपीने मालवाहू कॅरी वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर धारदार हत्याराने त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर हल्ला केला. आरोपी एवढ्यावरही थांबला नाही त्याने शिक्षिकेच्या डोक्यात दगड घातला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. हत्या करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
पोलिसांनी शशिकांत माणिकराव काकडे याला पाठबळ देणार्या उज्वला काकडे यांच्या सासु सुलोचना माणिकराव काकडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनावणे तपास करीत आहेत.
वाढदिवसाच्या दिवशीच मुलगी पोरकी झाली
ज्या दिवशी उज्ज्वला काकडे यांची निर्घृण हत्या झाली त्याच दिवशी त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता. आता त्यांच्या पश्चात लेक पोरकी झाली. आधी वडील आणि आता आईच्या प्रेमालाही लेक मुकल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







