पाणी भरण्याच्या वादातून तरुणाचा चाकूने वार करून खून ; बालेवाडी मधील घटना

पुणे- बालेवाडी येथील पाटील वस्ती परिसरात सार्वजनिक नळावरून पाणी भरण्याच्या वादातून १९ वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. या वादामध्ये मध्यस्ती करणाऱ्या तिघांवर आरोपीने हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि.१४) रात्री घडली.
करण राजू कापरे (वय १९, रा. पाटील वस्ती, बालेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रतीक संतोष मानकर (वय २१ रा. बालेवाडी) याला अटक केली.आरोपीने केलेल्या हल्ल्यात केरबा नामदेव शिंदे (वय ४७ रा. मधुबन सोसायटीसमोर अष्टविनायक चौक, बालेवाडी ) यांच्यासह दोन अल्पवयीन जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतीक मानकर हा एका हॉटेलमध्ये कामगार आहे. मृत करण कापरे आणि आरोपी प्रतीक मानकर दोघेही एकाच परिसरात राहायचे. मात्र, सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून त्यांच्यात बऱ्याच काळापासून वाद सुरू होते. प्रतीकच्या वागणुकीमुळे आपल्याला आणि इतर शेजाऱ्यांना पुरेसं पाणी भरता येत नाही, अशी करण आणि त्याच्या शेजारच्या मित्रांची तक्रार होती. याच कारणावरून त्यांच्यात यापूर्वीही अनेकदा खटके उडाले होते.
शनिवारी रात्री हाच पाणी भरण्याचा वाद पुन्हा एकदा भडकला. प्रतीकाला चांगलाच धडा शिकवायचा, या उद्देशाने करण आणि त्याचे तीन मित्र असे चौघे जण थेट प्रतीकच्या घरी गेले. चौघेही भांडण्याच्या उद्देशाने आपल्या घरी आल्याचे लक्षात येताच प्रतीकने तातडीने घरात धाव घेतली. त्याने घरातून एक धारदार चाकू आणून चौघांशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद आणखी वाढताच त्याने हातातील चाकू चौघांवर सपासप फिरवला. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन करण याचा मृत्यू झाला तर अन्य तिघेजण जखमी झाले. बाणेर पोलीस अधिक तपास करत आहेत.







