दुबईत नोकरीच्या शोधात गेलेल्या महिलेला देहविक्रीसाठी ठेवले डांबून ; अशी झाली सुखरूप सुटका

पुणे – हॉटेलमध्ये नोकरी आणि महिन्याला सव्वा लाख रुपये पगाराचे आमिष दाखवून एका महिलेला दुबईत नेण्यात आले. मात्र, दुबईत पोहोचल्यानंतर तिला देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून या महिलेची सुखरूप सुटका करून तिला मायदेशी आणण्यात आले.
संबंधित महिलेच्या कुटुंबावर कर्जाचा बोजा असून, पती दिव्यांग असल्याने तिने नोकरीसाठी दुबईला जाण्याचा निर्णय घेतला होता. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या एका व्यक्तीने तिला हॉटेलमध्ये नोकरी आणि दरमहा सव्वा लाख रुपये वेतनाचे आमिष दाखवले. मात्र, दुबईत पोहोचल्यानंतर तिला देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिने त्यास नकार दिल्यानंतर तिच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तिचा पासपोर्टही काढून घेण्यात आला आणि तिला डांबून ठेवण्यात आले.
या महिलेचे पती मदतीसाठी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात आले. त्यांनी पत्नीला दुबईत डांबून ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर मोहोळ यांच्या कार्यालयाने संबंधित महिलेचा ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न केले. परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाची मदत घेतली गेली.
संयुक्त अरब अमिरातीतील महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी आणि आयपीएफ महाहेल्पलाइनचे प्रमुख राहुल तुळपुळे यांच्याशीही समन्वय साधण्यात आला. वाणिज्य दूतावासाच्या मदतीने महिलेचा पासपोर्ट परत मिळविण्यात आला. या मोहिमेत राहुल तुळपुळे यांच्यासह श्वेता करंदीकर, प्रसाद दातार आणि प्रसाद पाटील यांनी प्रयत्न केले.
दरम्यान, “या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. नोकरीच्या आमिषाने महिलांना परदेशात पाठवून त्यांचे शोषण करणाऱ्या एजंटांच्या टोळीचा शोध घ्यावा आणि अशा फसवणुकीच्या प्रकारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी,” अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केल्या आहेत.







