हेल्थ सप्लिमेंट्स विकणाऱ्या पुणे विभागातील पाच आस्थापनांवर एफडीए चे छापे, ३०.५७ लाखांचा साठा जप्त

पुणे – आरोग्य सुधारण्याच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या हेल्थ सप्लिमेंट्स आणि न्यूट्रास्युटिकल्सच्या गुणवत्तेवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यव्यापी कठोर अनुपालन आदेश जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विभागात १३ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत पाच आस्थापनांची तपासणी करून तब्बल ३० लाख ५७ हजार १२० रुपये किमतीचा साठा जप्त केला आला आहे.
राज्यातील सहा विभागांमध्ये एकाच वेळी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण १७ आस्थापनांची तपासणी करून एक कोटी ३८ लाख ९५ हजार ८५२ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
आरोग्यपूरक उत्पादने, प्रोटीन पावडर, वजन कमी करणारी उत्पादने, क्रीडा पूरक आहार, हर्बल कॅप्सूल, मल्टिव्हिटॅमिन्स आणि विशेष आहारासाठीच्या उत्पादनांची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. मात्र, या उत्पादनांच्या नावाखाली अमान्य घटकांचा वापर, चुकीचे लेबलिंग, औषधी गुणधर्मांचे दावे आणि विनापरवाना विक्री होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला मिळाल्या आहेत. याची गंभीर दखल घेत अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २० नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी अनुपालन आदेश जारी केला.
विशेष म्हणजे, भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) उत्पादन मान्यता नाकारलेल्या मॅग्नेशियम अॅसिटिल टॉरेट आणि निकोटिनामाइड मोनोन्यूक्लिओटाइड या घटकांचा काही आरोग्यपूरक उत्पादनांमध्ये वापर होत असल्याचे तपासणीत आढळले. जप्त केलेल्या साठ्यातील नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे.
नव्या आदेशानुसार उत्पादक, वितरक, किरकोळ विक्रेते, औषध दुकाने, व्यायामशाळा, फिटनेस सेंटर, रुग्णालयांना पुरवठा करणारे आणि ई-कॉमर्स कंपन्यांनाही नियमांचे पालन करावे लागणार आहे. औषध दुकान किंवा जिममध्ये अशी उत्पादने विकण्यासाठी स्वतंत्र अन्न परवाना अथवा नोंदणी आवश्यक असेल. रोग बरा करण्याचे, मधुमेह किंवा रक्तदाब नियंत्रित करण्याचे, झटपट वजन कमी करण्याचे तसेच डॉक्टरांनी शिफारस केल्याचे दिशाभूल करणारे दावे करता येणार नाहीत. सोशल मीडिया आणि प्रभावकांच्या जाहिरातींनाही हे नियम लागू असतील असे एफडीए ने स्पष्ट केले आहे.







