पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात थेट कनेक्टिव्हिटी ; असे असतील तीन भुयारी मार्ग

मुंबई- पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’च्या धर्तीवर तीन भव्य भुयारी मार्ग (टनेल) तयार करण्याचे नियोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथे जाहीर केले. यामुळे घाटरस्त्यांचा त्रास कमी होऊन प्रवास जलद आणि सुरक्षित होणार आहे.
या प्रस्तावित प्रकल्पामुळे महाबळेश्वर परिसरातील पर्यटकाला चालना मिळणार आहे. या भागात पर्यटन वाढल्यास स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचणार आहे. परिणामी महाबळेश्वर, पांचगणी कास पठार, तापोळा आणि कोकणातील पर्यटन स्थळापर्यंत पोहोचणे सुलभ होणार आहे.
असे असतील प्रस्तावित तीन भुयारी मार्ग-
१. पोलादपूर ते जांभळी (वाई): कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथून वाई तालुक्यातील जांभळी गावापर्यंत हा भुयारी मार्ग असणार आहे.
२. खेड ते सातारा (रघुवीर घाट आणि कास पठार): खेड तालुक्यातून रघुवीर घाट आणि कास पठाराच्या खालून साताऱ्याला जोडणारा भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे.
३. पाचवड ते मेढा आणि मेढा ते तापोळा: यामध्ये पाचवड ते मेढा नवीन महामार्ग तयार केला जाणार असून, पुढे मेढा ते तापोळा हा टप्पा भुयारी मार्गाने जोडला जाईल.
या सर्व मार्गांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) सुरू असल्याची माहिती आहे.







