आशुतोष डुंबरे, देवेन भारती यांना पोलीस महासंचालकपदी पदोन्नती

आशुतोष डुंबरे, देवेन भारती यांना पोलीस महासंचालकपदी पदोन्नती
Share

मुंबई – महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भात राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पोलीस महासंचालक श्रेणीतील पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही अधिकाऱ्यांना सध्याच्या पदावर कायम ठेवून पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे आणि मुंबई पोलीस आयुक्तालयांच्या नेतृत्वात तूर्तास कोणताही बदल होणार नाही.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने २० नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. पोलीस महासंचालक श्रेणीतील पदोन्नतीसाठी तयार करण्यात आलेल्या अपर पोलीस महासंचालक श्रेणीतील भारतीय पोलीस सेवेच्या अधिकाऱ्यांच्या निवडसूची-२०२६ मध्ये या दोन्ही अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२न मधील तरतुदींनुसार त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

या आदेशानुसार, आशुतोष डुंबरे यांची ठाणे शहर पोलीस आयुक्तपदावरून ठाणे शहर पोलीस आयुक्तपदीच (इन-सिटू पदोन्नती) पदोन्नती करण्यात आली आहे. तर देवेन भारती यांची बृहन्मुंबई पोलीस आयुक्तपदावरून त्याच पदावर इन-सिटू पदोन्नती करण्यात आली आहे.

या पदोन्नतीमुळे दोन्ही अधिकाऱ्यांच्या पदाचा दर्जा उंचावला असला, तरी त्यांच्या विद्यमान पदस्थापनेत बदल करण्यात आलेला नाही. गृह विभागाने हा आदेश सर्वोच्च सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने निर्गमित केल्याचेही शासन आदेशात स्पष्ट केले आहे.

राज्यपालांच्या आदेशानुसार गृह विभागाचे सहसचिव सुग्रिव संभाजी धपाटे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबई आणि ठाणे पोलीस दलातील दोन्ही प्रमुख अधिकाऱ्यांना एकाचवेळी पदोन्नती मिळाली असून, पोलीस प्रशासनात या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Vedh News