ब्रेकिंग न्यूज

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये टेक ऑफ घेतानाच तांत्रिक बिघाड

Share

अहमदाबाद- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुजरात दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली आहे. वडनगर ते अहमदाबाद प्रवासादरम्यान ही घटना घडली. सुदैवाने, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठा अपघात टळला असून, सुरक्षेचा उपाय म्हणून एकनाथ शिंदे कारने प्रवास करण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वडनगर येथील आपले नियोजित कार्यक्रम उरकून पुढील प्रवासासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसणार होते. मात्र, टेक-ऑफ करण्यापूर्वीच हेलिकॉप्टरच्या पायलटने अत्यंत तत्परता दाखवत तांत्रिक बिघाड वेळीच ओळखला. कोणताही धोका न पत्करता पायलटने हेलिकॉप्टरचे उड्डाण तातडीने रोखले, ज्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.

उड्डाण रद्द झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षेच्या कारणास्तव तत्काळ पर्यायी व्यवस्था केली. वडनगर येथील सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रस्ते मार्गाने कारने अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. या घटनेमुळे काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र सर्व सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.