पुणे पदवीधर मतदारसंघातून अटीतटीच्या लढतीत हर्षदा जाधव यांचा तब्बल ९७०० मतांनी विजय

पुणे – पुणे मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला असून भाजपाच्या उमेदवार स्मीता जाधव यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख- जाधव यांचा तब्बल ९७०० मतांनी विजय झाला आहे.
ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकद लावली होती. सोबतच ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाच्या बड्या नेत्यांनीही जोर लावला होता. परंतु या जागेवरून भाजपाच्या उमेदवार स्मीता जाधव यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या विजयानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जल्लोषाचे वातावरण आहे.
पदवीधर आणि शिक्षक हे दोन्ही मतदारसंघ भाजपाचे बालेकिल्ला मानले जातात. या दोन्ही जागांवर आमचाच विजय होईल, असा विश्वास भाजपाकडून व्यक्त केला जात होता. मात्र शिक्षक मतदारसंघात विजय झाला असला तरीही पदवीधर मतदारसंघात पराभव पत्कारावा लागल्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी अवस्था भाजपाची झाली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेही आपला उमेदवार उभा केला होता. ही जागा जिंकण्यासाठी या पक्षानेही जोर लावला होता. परंतु शिवसेनेच्या सुनील मोदी यांना ३०६६ मते मिळाली. सुनील मोदी यांच्यामुळे हर्षदा जाधव यांना मिळणारी मते विभागली जातील आणि त्याचा फायदा भाजपाच्या स्मीता जाधव यांना होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु सुनील मोदी यांनी निवडणूक लढवलेली असूनही हर्षदा जाधव यांची आघाडी कायम राहिली.
हर्षदा देशमुख-जाधव यांना १,११,५९१ मते मिळाली. तर भाजपच्या स्मिता जाधव यांना १,०२,७०४ मते मिळाली. पहिल्या पसंतीची मते पाहता महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांना १ लाख ११ हजार २०४ मते मिळाली. तर भाजप उमेदवार स्मिता जाधव यांना १ लाख २ हजार ३३५ मते मिळाली.
पुणे पदवीधर निवडणुकीत झालेल्या मतदानापैकी २ लाख २६ हजार २२४ मते वैध ठरली आहेत. विजयासाठी १ लाख १३ हजार ११३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. या निवडणुकीत तब्बल १७ हजार २९९ मते बाद झाली आहेत.






