भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणासहित कारचालकाचाही मृत्यू, उरुळी कांचन येथील घटना
उरुळी कांचन – भरधाव कारने धडक दिल्यामुळे १९ वर्षीय दुचाकीस्वार तरुणासहित कार चालकाचा देखील मृत्यू झाला. या अपघातात मोटारसायकलवर पाठीमागे बसलेली १६ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हंस भीषण अपघात पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे साखरे पेट्रोल पंपा जवळ रविवारी (दि. ८) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.
नयन नितीन हजारे (वय १९,रा.तुपेवस्ती, उरुळी कांचन) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर कारचालक तुषार उर्फ अमर रोहिदास कुंजीर (वय २३,रा.वळती,ता.हवेली) याचाही या अपघातात मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नयन आणि त्याची बहीण मोटारसायकल (एमएच १२ एलसी ५५२६) वरून सोलापूरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (एमएच १२ पीठी ९०८९) त्यांच्या मोटार सायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत नयनचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगत असलेल्या एका झाडावर जाऊन जोरदार आदळली. या भीषण अपघातात कारचालक तुषार कुंजीर याचाही गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे हे करीत आहेत.
