महाराष्ट्रातील निवडक ५४० शाळांचे त्रयस्थ गुणवत्ता मूल्यांकन होणार !

मुंबई- महाराष्ट्रातील निवडक ५४० शाळांचे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत NABET-QCI या संस्थेमार्फत त्रयस्थ मूल्यांकन केले जाणार असून, ही प्रक्रिया ६० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतची तपशीलवार माहिती महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आली आहे.
या कामाची जबाबदारी NABET-QCI या शासकीय स्वायत्त संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून पुढील ६० दिवसांत ही कार्यवाही पूर्ण करणे बंधनकारक आहे. मागील शैक्षणिक वर्षात म्हणजेच २०२४-२५ मध्ये राज्यातील एकूण १,०२,६७५ शाळांनी आपले स्वयं-मूल्यांकन पूर्ण केले होते. स्वयं-मूल्यांकनात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळांमधून २०२५-२६ मध्ये १०,६४४ शाळांचे बाह्य मूल्यांकन पूर्ण झाले. बाह्य मूल्यांकनातील सर्वोच्च गुणांकनाच्या आधारे ५४० शाळांची त्रयस्थ तपासणीसाठी निवड झाली. निवड करण्यात आलेल्या ५४० शाळांपैकी A+ श्रेणी मिळालेल्या शाळांची संख्या ४२८ व A श्रेणी मिळालेल्या १०६७ शाळांपैकी सर्वाधिक गुण मिळवलेल्या ११२ शाळांची निवड करण्यात आली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांनी सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण निरीक्षकांना या संदर्भात स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मूल्यांकनादरम्यान पळवाट राहू नये आणि कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी काही ठोस निकष ठरवण्यात आले आहेत.
तपासणीची संपूर्ण प्रक्रिया ‘Pi-Jam फाउंडेशन’ने तयार केलेल्या ॲप किंवा लिंकच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे. प्रत्येक निवडक शाळेला ‘NABET-QCI’चे दोन प्रतिनिधी प्रत्यक्ष भेट देतील. शाळांच्या मूल्यांकनाचे वेळापत्रक आणि शाळानिहाय नियोजन संस्थेकडूनच कळवले जाणार आहे.







