मोशीत शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्याचा बुडून मृत्यू

मोशीत शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्याचा बुडून मृत्यू
Share

पिंपरी -मोशीतील बनकर वस्ती परिसरात शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. २५) संध्याकाळी घडली.

सिद्धांत उत्तम लगाडे (वय २१) आणि रितेश रमेश ताकपेरे (वय १२, दोघेही रा. बनकर वस्ती, मोशी) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे मोशी परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२५) रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मामा भाचे दोघेही तुलसीरत्न सोसायटीजवळील बनकर वस्ती येथील शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या मोशी उप अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी दोरीच्या साहाय्याने शेततळ्यात उतरून दोघांनाही पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यांना साईनाथ हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर रात्री दोघांनाही मृत घोषित केले.

या प्रकरणी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. एकाच कुटुंबातील मामा-भाच्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Vedh News