बारामतीत खंडणीच्या मागणीसाठी उद्योजकाच्या गाडीवर गोळीबार; शिवशंभूनगर परिसरात खळबळ

बारामती- बारामती एमआयडीसी परिसरातील शिवशंभोनगर येथे बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक राजन कोळेकर यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या डिफेंडर गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी दोन गोळ्या झाडल्या. ही घटना शनिवारी (दि. २१) संध्याकाळी ६ वाजता घडली. भर वस्तीत घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तानाईनगरपासून काही अंतरावर असलेल्या शिवशंभूनगर येथे राजन कोळेकर यांच्या घरासमोरील पार्किंगमध्ये त्यांची डिफेंडर (एमएच ४२ बीव्ही ७४७४) गाडी उभी होती. या गाडीवर दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी दोन गोळ्या झाडल्या. गोळीबार करून हल्लेखोर घटना स्थळावरून पसार झाले. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.
शनिवारी दुपारी इंस्टाग्राम वरून राजन कोळेकर यांना एका व्यक्तीने दोन पेटी खंडणीची मागणी केली होती अशी माहिती देखील समोर आली आहे. हे पैसे देण्यास कोळेकर यांनी नकार दिल्यानंतर गोळीबाराची घटना घडली.
घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. यानंतर बारामती तालुका पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून घटनास्थळाचा पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम व पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे.
भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गोळीबार कोणी केला, त्यामागील कारण काय आणि हल्लेखोरांचा नेमका उद्देश काय होता, याबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. पोलिसांच्या तपासात काय माहिती समोर येते? ते पाहणे आता महत्त्वाचे आहे.







