‘रोहित पवार यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखवण्याची गरज’ ; आमदार सुनील शेळके यांची रोहित पवार यांच्यावर जहरी टीका

पुणे – पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अजितदादांची जागा कुणी घेऊ शकत नाही असं वक्तव्य केले होते. त्यावर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली. रोहित पवार यांना आता एखाद्या ‘मेंटल हॉस्पिटलमध्ये’ दाखवण्याची वेळ आली आहे, असा टोला सुनील शेळके यांनी लगावला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींना दादांसारखे काम करता येत नाही या रोहित पवार यांच्या विधानावर मावळचे आमदार सुनील शेळके आक्रमक झाले आहेत. रोहित पवार यांच्यावर टीका करताना
आमदार सुनील शेळके म्हणाले की, अजित दादांच्या अकाली जाण्यामुळे सुनेत्रा वहिनींवर अचानक ही जबाबदारी आली आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि स्वतःला कर्तबगार दाखवण्यासाठी स्वतःच्याच कुटुंबावर शिंतोडे उडवणे थांबवावे. त्यापेक्षा रोहित पवारांनी आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवावेत, ते किती कर्तबगार आहेत हे तिथली जनताच बोलू लागली आहे. तसेच सुनेत्रा वहिनी एक महिला असूनही कठीण परिस्थितीत अत्यंत सक्षमपणे ही जबाबदारी पार पाडत आहेत.
त्या सकाळी ७ वाजल्यापासून कामाला सुरुवात करतात. बारामती, पुणे जिल्हा, राज्य आणि पक्षाच्या जबाबदाऱ्यांसह सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील संस्थाही त्या उत्तमरीत्या सांभाळत असल्याचा आम्हाला अभिमान आणि समाधान आहे. महायुती सरकारमध्ये कोणाला कोणते पद द्यायचे, हे आमचे नेते ठरवतील. रोहित पवारांनी आमच्या पक्षात आणि महायुतीत नाक खुपसण्याची गरज नाही. त्यापेक्षा त्यांना स्वतःच्या पक्षात किती किंमत उरली आहे आणि त्यांना कोणी विचारते का? याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोलाही शेळके यांनी लगावला.
रोहित पवार केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी राज्यातील आणि देशातील नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. जर ते स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींवरच असे बिनबुडाचे आरोप करत असतील, तर त्यांना आता एखाद्या ‘मेंटल हॉस्पिटलमध्ये’ दाखवण्याची वेळ आली आहे, असा टोला सुनील शेळके यांनी लगावला.







