पुणेकरांनो, आता तुम्ही सुद्धा करा अनधिकृत फ्लेक्सवरील कारवाईसाठी पालिकेला मदत ! कशी ते जाणून घ्या

पुणेकरांनो, आता तुम्ही सुद्धा करा अनधिकृत फ्लेक्सवरील कारवाईसाठी पालिकेला मदत ! कशी ते जाणून घ्या
Share

पुणे – शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात पुणे महापालिकेने धडक मोहीम सुरु केल्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहेत. आता पुणे महापालिकेने आपला मोर्चा अनधिकृत फ्लेक्स आणि जाहिरातींकडे वळवला आहे. त्यामध्ये पुणेकरांना देखील सहभागी करण्याचे ठरवले आहे.

शहरात ठिकठिकाणी लावण्यात येणाऱ्या अनधिकृत फ्लेक्सची माहिती नागरिकांना थेट महापालिकेपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी प्रशासनाने स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. या सुविधेमुळे नागरिकांना अनधिकृत फ्लेक्सचा फोटो काढून त्याचे ठिकाण नोंदवता येणार आहे.

महापालिकेच्या या उपक्रमाचे नाव ‘फ्लेक्स काढा’ असे असून, नागरिकांच्या सहभागातून अनधिकृत फ्लेक्सची माहिती संकलित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी https://bhauflexkadha.pmc.gov.in/ हे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवरून नागरिकांना तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

या पोर्टलच्या मुख्य पानावर नागरिकांसाठी फोटो काढण्याचा पर्याय देण्यात आला आहे. एखाद्या परिसरात अनधिकृत फ्लेक्स आढळल्यास नागरिकांना त्याचा फोटो अपलोड करता येईल. त्याचबरोबर संबंधित फ्लेक्स नेमका कुठे लावण्यात आला आहे, याची माहिती म्हणजेच लोकेशनही नोंदवता येणार आहे. पोर्टलवर फोटो काढणे, ठिकाण अपलोड करणे आणि महापालिकेकडून होणारी कारवाई अशा तीन प्रमुख बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, तक्रारदार नागरिकांची ओळख गोपनीय ठेवण्याची तरतूदही करण्यात आली आहे. पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव किंवा ओळख उघड केली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांना स्वतःची ओळख समोर येण्याची चिंता न करता अनधिकृत फ्लेक्सची माहिती प्रशासनाला देता येणार आहे.

Vedh News