शिरूर पोलीस ठाण्यातील लाचखोर फरार हवालदार सतीश मुंढे दीड महिन्यानंतर एसीबीच्या जाळ्यात
शिरूर – लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाला चकवा देऊन फरार झालेला पोलीस हवालदार सतीश नाथराव मुंढे (वय ४५) अखेर तब्बल दीड महिन्यानंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तक्रारदाराला अटक न करणे आणि प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात मुंढे याने एक लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत एसीबीकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर ३० सप्टेंबर ला टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्रात सापळा रचण्यात आला.
तडजोडीअंती निश्चित झालेली ९५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबी पथकाची चाहूल लागताच मुंढे याने लाचेची रक्कम आणि संबंधित गुन्ह्याची कागदपत्रे घेऊन पळ काढला. त्यानंतर तब्बल दीड महिना तपास यंत्रणांना गुंगारा देणाऱ्या मुंढेला एसीबीच्या पुणे पथकाने शिरूर नगरपरिषद परिसरातून अटक केली.
अटकेनंतर न्यायालयाने त्याला सुरुवातीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी (ता. २०) पुन्हा न्यायालयात हजर केले असता तपासासाठी आणखी तीन दिवसांची कोठडी मंजूर केली. या काळात त्याचे कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि लाचेच्या रकमेचा प्रवास तपासला जाण्याची शक्यता आहे.
‘माझा बाप वरती बसलाय….’
या प्रकरणात लाचेची मागणी करताना मुंढेने वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही उल्लेख केल्याचे एसीबीच्या तक्रारीत नमूद आहे. ‘माझा बाप वरती बसलाय, त्यालाही पैसे द्यावे लागतील. मी साहेबांना तसे सांगितले आहे. आता कमी नाही होणार, मला माझ्या पदरचे घालावे लागतील,’ अशा शब्दांत त्याने तक्रारदाराकडे पैशांची मागणी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वरिष्ठांचा उल्लेख केवळ तक्रारदारावर दबाव निर्माण करण्यासाठी होता की, लाचेच्या व्यवहारात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता, याचा तपासातून उलगडा होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लाचेची ९५ हजार रुपयांची रक्कम अद्याप हस्तगत झालेली नाही. विशेष म्हणजे, या रकमेत ॲन्थ्रासीन पावडर लावलेल्या नोटांचाही समावेश होता. या नोटा नेमक्या कुठे ठेवल्या आहेत, याची माहिती आरोपीकडून मिळणे आवश्यक आहे.

