त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने उजळला दगडूशेठ गणपती मंदिराचा गाभारा

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने उजळला दगडूशेठ गणपती मंदिराचा गाभारा
Share

पुणे- त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळवारी (दि.२४) पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तिमय वातावरणात दीपोत्सव आणि अन्नकोटाचे आयोजन करण्यात आले. शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने मंदिराचा गाभारा, सभामंडपासह संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला. मंदिराच्या कळसापर्यंत प्रज्वलित केलेल्या दिव्यांमुळे मंदिराला आकर्षक आणि मनमोहक स्वरूप प्राप्त झाले. या नेत्रदीपक सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी पुणेकरांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी दिव्यांच्या प्रकाशात उजळलेल्या मंदिराचे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात विशेष दीपोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी मंदिरातील प्रत्येक भागात दिव्यांची आकर्षक सजावट करण्यात आली असून गाभारा, सभामंडप आणि मंदिराच्या परिसरात लावलेल्या दिव्यांमुळे संपूर्ण मंदिर प्रकाशमय झाले.

त्याचबरोबर तोरणे, विविध प्रकारची फुले आणि आकर्षक रांगोळ्यांनी मंदिर परिसर सजविण्यात आला. पारंपरिक पद्धतीने साजऱ्या करण्यात आलेल्या या दीपोत्सवामुळे मंदिरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. दीपोत्सवाबरोबरच त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बाप्पाच्या चरणी ५५१ हून अधिक पदार्थांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. यासाठी मंदिरात आकर्षक अन्नकोट साकारण्यात आला .

गोड, तिखट, आंबट आणि खारट अशा विविध चवींचे पदार्थ, मिठाई तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा यामध्ये समावेश होता. विविध रंगांचे आणि प्रकारांचे पदार्थ सुबकपणे मांडून हा अन्नकोट तयार करण्यात आला. लाडक्या गणरायाला ५५१ हून अधिक पदार्थांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. या अन्नकोटाचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांनी गर्दी केली होती.

विशेष म्हणजे, या अन्नकोटासाठी पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने भाविकांना करण्यात आले होते. त्याला पुणेकर आणि गणेशभक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाविकांनी श्रद्धेने विविध प्रकारचे पदार्थ मंदिरात आणून दिले. त्यानुसार ५५१ हून अधिक प्रकारचे पदार्थ जमा झाले. हे सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडून बाप्पाला महानैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर मंदिरात येणाऱ्या भाविकांना हे पदार्थ प्रसाद म्हणून वितरित करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.

यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते. महेश सूर्यवंशी म्हणाले, बळीराजावर आलेले संकट दूर व्हावे आणि महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना यावेळी गणरायाच्या चरणी करण्यात आली.

एकीकडे दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेले मंदिर आणि दुसरीकडे विविध पदार्थांनी सजलेला अन्नकोट, अशा दुहेरी भक्तिमय सोहळ्यामुळे दगडूशेठ गणपती मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला.

Vedh News