नोकरीच्या बहाण्याने ११ डॉक्टरांना घातला प्रत्येकी १० लाखांना गंडा

नोकरीच्या बहाण्याने ११ डॉक्टरांना घातला प्रत्येकी १० लाखांना गंडा
Share

पुणे – वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारा एक मोठा भरती घोटाळा पुण्यात उघडकीस आला आहे. महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने ११ कंत्राटी डॉक्टरांची प्रत्येकी १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात पैसे गोळा करण्यासाठी तीन डॉक्टरच एजंट म्हणून काम करत असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार डॉक्टरांनी केला आहे.

पुणे महापालिकेने चार वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज सुरू केले असून, सुरुवातीला येथे कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नियुक्ती केली होती. मात्र, वर्षभरापूर्वी कायमस्वरूपी प्राध्यापकांची भरती करण्याचा निर्णय झाला होता. एमडी आणि एमएस शिक्षण घेतलेल्या २८ डॉक्टरांची कायमस्वरूपी निवड केली जाणार होती. त्यासाठी कार्यरत असलेल्या कंत्राटी डॉक्टरांकडून प्रत्येकी १० लाख रुपये उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पैसे देऊनही वर्षभरानंतर ११ डॉक्टरांची नियुक्ती झाली नाही. त्यांनी दिलेले पैसे परत मागितले असता टाळाटाळ करण्यात आली. सुरुवातीला पीडित डॉक्टरांनी कॉलेजच्या ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या महापौरांकडे तक्रार केली. मात्र, तेथून दाद न मिळाल्याने अखेर त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे दरवाजे ठोठावले.

याप्रकरणी डॉ. नानासाहेब भांगरे, डॉ. इरफान मुल्ला आणि डॉ. हेमंत वैद्य यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गंभीर प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तात्काळ दखल घेतली आहे. एसीबीचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन-तीन दिवसांत सर्व तक्रारदार डॉक्टरांचे सविस्तर जबाब नोंदवले जातील. त्यानंतर या संपूर्ण घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी पुणे महापालिका आयुक्तांकडे रीतसर परवानगी मागितली जाणार आहे. आता या रॅकेटमागचे खरे सूत्रधार कोण आणि कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात गेले, हे एसीबीच्या तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

Vedh News