सिग्नल तोडल्याचे सांगत दोघा तोतया वाहतूक पोलिसांनी वृद्धाकडील ५ लाखांचे दागिने पळवले ; पौड रस्त्यावरील घटना

पुणे – वाहतूक नियम मोडल्याचे कारण देत दोघांनी ज्येष्ठाला रस्त्यात थांबवले. वाहतूक पोलीस असल्याचे भासवून भामट्यानी त्यांच्याकडील ५ लाख २० हजार रुपयांचे दागिने पळवून नेले.
ही घटना भर दुपारी कोथरूड भागात पौड रोडवरील एच डी एफ सी बँके समोरील रस्त्यावर बुधवारी (दि. १८) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका ६२ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोथरूडमधील भुसारी कॉलनीत राहायला आहेत. ते बुधवारी दुपारी पौड फाटा चौकातून निघाले होते. काही अंतरावर दोघा चोरट्यांनी त्यांना अडविले. साध्या वेशातील त्यांनी वाहतूक पोलीस असल्याची बतावणी केली. सिग्नल तोडला असल्याचे सांगून चोरट्याने दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी आपल्या हातातील सोन्याची अंगठी व गळ्यातील चैन असा ५ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने काढून दिले. हे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. आपण हे दागिने कसे काढून दिले हे या नागरिकाच्या लक्षात आले नाही.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुप्रिया जगताप तपास करत आहेत.







