शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी गणेश मारणेला पुण्यात प्रवेश करण्यास बंदी ; मकोका न्यायालयाचा आदेश

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी गणेश मारणेला पुण्यात प्रवेश करण्यास बंदी ; मकोका न्यायालयाचा आदेश
Share

पुणे- पुणे- शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी गणेश निवृत्ती मारणे याच्यावरील पुणे शहर प्रवेशबंदी कायम ठेवण्याचा निर्णय विशेष मकोका न्यायालयाने दिला आहे. पुणे शहरात प्रवेश करण्यास परवानगी मिळावी, यासाठी मारणे याने दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. पुण्यात कुटुंबीय, व्यवसाय असून, तीन मुले शिक्षण घेत आहेत; तसेच वृद्ध आईची काळजी घेण्यासाठी शहरात येणे आवश्यक असल्याचे कारण देऊन त्याने ही अट शिथिल करण्याची मागणी केली होती.

दोन वर्षांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या झाली होती. या हत्याकांडाने संपूर्ण पुण्याला हादरवून सोडले होते. या प्रकरणात गणेश मारणे अन् त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्षानंतर मारणे याला ७ मे २०२६ रोजी जामीन मंजूर झाला. हा जामीन मंजूर होताना तीन वर्षे किंवा खटल्याचा निकाल लागेपर्यंत पुण्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती.

पुण्यात कुटुंब आणि व्यवसाय असून, तीन मुलांचे शिक्षण तसेच वृद्ध आईची काळजी घेण्यासाठी शहरात येणे आवश्यक असल्याचे कारण देत गणेश मारणे याने न्यायालयात अर्ज केला होता. विशेष सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत आणि मोहोळ कुटुंबीयांच्या वतीने ॲड. खेताराम सोलंकी, ॲड. संकेत राव, ॲड. तेजस सावंत आणि ॲड. भानुदास कोळी यांनी अर्जाला विरोध केला. मारणे याच्या शहर प्रवेशामुळे साक्षीदारांवर दबाव येण्याची आणि शहरात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता असल्याचा मुद्दा न्यायालयात मांडण्यात आला होता. त्यानंतर विशेष मकोका न्यायाधीश एच. एम. भोसले यांनी ७ नोव्हेंबर २०२६ रोजी गणेश मारणेचा अर्ज फेटाळला अन् बंदी कायम ठेवली. जामीन अटी लावून ५ महिनेच झाले असून परिस्थितीमध्ये कोणताही ठोस बदल झालेला नसल्याचे निरीक्षण नोंदवून हा निकाल दिला आहे.

Vedh News