पुण्याजवळ पाबे घाटात १५० फूट दरीत कार कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही

पुण्याजवळ पाबे घाटात १५० फूट दरीत कार कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही
Share

पुणे- घाट चढत असताना अचानक बंद पडलेली कार पावसामुळे ओलसर झालेल्या रस्त्यावर घसरत थेट सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळली. ही घटना पुण्याच्या राजगड तालुक्यातील पाबे घाटात शनिवार (दि. 31) रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मोनस अरविंदभाई चभाडिया, (सध्या राहणार हडपसर, पुणे) हे त्यांचे मित्र उमेश कैलास बागडे व मैत्रीण रितिका सिंग स्विफ्ट डिझायर (MH-03-BS- 9740) गाडीमधून तोरणा किल्ला पाहण्यासाठी हडपसर येथून निघाले होते. राजगड तालुक्यातील पाबे घाट चढत असताना अचानक बंद पडलेली कार पावसामुळे ओलसर झालेल्या रस्त्यावर घसरत थेट सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने कार झाडाला अडकल्याने ते बचावले. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मागून येणाऱ्या पर्यटकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे कारमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

दरम्यान घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य तानाजी भोसले, संदीप सोळसकर, दिलीप तळेकर यांना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले व मदत कार्य करत तिघांना पुढील उपचारासाठी वेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुणे शहरात पाठवण्यात आले.

Vedh News