वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप निलंबित ; ३० लाखांची चोरी दडपणे भोवले, काय आहे प्रकरण जाणून घ्या

पुणे – मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांच्या डोळ्यात स्प्रे मारून ३० लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून न घेता फक्त मिसिंगची तक्रार दाखल करणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप यांना महागात पडले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केली असून, या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबतची हकीकत अशी की ७ सप्टेंबर रोजी श्रवण देवासी आणि त्यांचे सहकारी गणपत देवासी हे दोघे दुपारी सव्वाएकच्या सुमारास दुचाकीवरून व्यवसायाची ३० लाख रुपयांची रोकड बॅगमध्ये घेऊन जात होते. शिवनेरी रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्र आणि पूजा मेडिकलसमोर पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन तरुणांनी त्यांची दुचाकी फिर्यादींच्या वाहनाला आडवी लावली.
आरोपींनी दोघांच्याही चेहऱ्यावर स्प्रे मारला त्यामुळे त्यांची नजर धूसर होताच दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी फिर्यादींच्या वाहनावरील रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर पाचही दरोडेखोर सिटी प्राईड चौकातून कात्रजच्या दिशेने पसार झाले.
त्वरित श्रवण देवासी यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मात्र ड्युटीवरील पोलीस अंमलदाराने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप यांनी या प्रकरणाची गंभीर दखल न घेता जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून घेण्याऐवजी केवळ बॅग मिसिंग झाल्याची तक्रार दाखल करून घेतली. तसेच या प्रकरणाचा काहीही तपास केला नाही.
दरम्यान, त्यानंतर काही दिवसांनी स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत सॅलिसबरी पार्क परिसरात एका व्यक्तीच्या हातातील साडेचार लाखांची रक्कम असलेली बॅग चोरण्याचा प्रयत्न काही अज्ञात चोरट्यानी केल्याची घटना घडली. मात्र संबंधीत व्यक्तीने आरडाओरड केल्यामुळे आसपासच्या नागरिकांनी धाव घेतली. हे पाहून चोरटे बॅग न घेता घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेचा तपास करून स्वारगेट पोलिसांनी मुंढवा येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस तपासात या दोघांनी मार्केटयार्ड परिसरात अशाच प्रकारे ३० लाख रुपयांची रोकड पळवल्याचे कबूल केले.
त्यामुळे स्वारगेट पोलिसांनी मार्केटयार्ड पोलिसांकडे चौकशी केली असता मार्केटयार्ड पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला. प्राथमिक चौकशीत जगताप यांनी कर्तव्यात बेजबाबदार वर्तन केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या या वर्तनामुळे शिस्तप्रिय पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विश्वजित जगताप यांचे निलंबन केले आहे. निलंबन काळात त्यांना नियंत्रण कक्षात रोज हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.






