महापौर रवी लांडगे यांचे महानगरपालिकेला कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस व वेतन अदा करण्याचे आदेश

महापौर रवी लांडगे यांचे महानगरपालिकेला कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस व वेतन अदा करण्याचे आदेश
Share

पिंपरी- राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर “विनम्र अभियान पदयात्रा” काढण्यात आली. यावेळी महापौर रवी लांडगे यांची भेट घेऊन कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांचा २०२५-२६ या वर्षाचा बोनस आणि मासिक वेतन दिवाळीपूर्वी, म्हणजेच ३ नोव्हेंबर २०२६ च्या आत अदा करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

महापौर रवी लांडगे यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत बैठकीला उपस्थित असलेले संबंधित मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांना तातडीने कार्यवाही करून बोनस दिवाळीपूर्वी अदा करण्याचे परिपत्रक काढण्याच्या सूचना दिल्या.

भीमसृष्टीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभियान पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी हजारो कामगार सहभागी झाले होते.यावेळी परिसर कामगाराच्या घोषणांनी दणाणून गेला.

कामगार नेते यशवंत भोसले यांनी विनम्र अभियान पदयात्रेदरम्यान महापौर रवी लांडगे यांना निवेदन दिले. त्या निवेदनात त्यांनी आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी वाहन चालक, वैद्यकीय मधील स्वच्छता सेवक, वार्ड बॉय, नर्सेस, तांत्रिक कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी उद्यान विभाग मधील कर्मचारी, अग्निशमन विभागातील वाहनचालक व अग्निशमन कर्मचारी, पालिकेच्या सर्व शाळांमधील स्वच्छता सेवक शिपाई व इतर कर्मचारी, स्मशानामधील सर्व कर्मचारी, पाणीपुरवठा व जलवाहिनी विभाग मधील सर्व कर्मचारी सर्व प्रभागांमध्ये काम करणारे कंत्राटी पद्धतीवर दाखवण्यात आलेल्या सुमारे ४५०० कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन देण्यात यावे. महापालिकेने रक्कम रुपये पाच लाखापर्यंतचा परिवारासह विमा उतरावावा. कर्मचाऱ्याचा अपघाती अथवा आजारी पडून मृत्यू झाल्यास वारसदारास रक्कम रुपये २५ लाख भरपाई पोटी देण्यात यावेत. तसेच अनुकंपा तत्वावर वारसदार यास महापालिकेत नोकरी देण्यात यावी या कायदेशीर मागण्यांना मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी महापौर रवी लांडगे म्हणाले, ” आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतील सर्व कंत्राटी आणि मानधनावरील कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे. बोनस देण्यासंदर्भातील परिपत्रक आज संध्याकाळी किंवा उद्या काढण्यात येईल. आचारसंहितेबाबतची घोषणा अद्याप झालेली नसल्याने त्यानंतर सोमवारी सर्व कामगारांना बोनस देण्याबाबतची प्रक्रिया सविस्तरपणे निश्चित करण्यात येईल.

यशवंत भोसले म्हणाले की, दिवाळी बोनसच्या मागणीसाठी आज महापौर रवी लांडगे यांची भेट घेतली. यावेळी महापौरांनी कामगार अधिकारी जगताप यांना तातडीने परिपत्रक काढण्याचे आदेश दिले. कायदेशीररीत्या पात्र असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे, अशी भूमिका महापौरांनी घेतली. काही ठेकेदार पगारामध्ये बोनस समाविष्ट असल्याचे सांगून बोनस देण्यापासून पळवाट काढतात. अशा प्रकारे बोनस न देणाऱ्या ठेकेदारांबाबतही महापौरांनी सूचना केल्या आहेत. याशिवाय समान काम, समान वेतन, कर्मचाऱ्यांची इन्शुरन्स पॉलिसी, तसेच मानधनावर काम करणाऱ्या नर्सेसच्या विखंडित झालेल्या ठरावाबाबत आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या विषयांवर सोमवारी किंवा मंगळवारी बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिले असून त्यांनी घेतलेल्या सकारात्मक या निर्णयाबद्दल हजारो कामगारांच्या वतीने महापौर रवी लांडगे यांचे मनःपूर्वक आभार मानतो”

Vedh News