इंद्रायणीनगरमधील दूषित आणि अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवा; नगरसेवक तुषार सहाणे, नगरसेविका अश्विनी वाबळे यांची मागणी

पिंपरी- मोशी प्राधिकरण आणि इंद्रायणी नगर परिसरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये दूषित, अनियमित तसेच कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा विधी समिती सदस्य तुषार सहाणे आणि नगरसेविका अश्विनी वाबळे यांनी महापालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत महापालिकेत तातडीची आढावा बैठक घेऊन विविध समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
या बैठकीला महापालिकेचे शहर अभियंता मनोज सेठिया, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भोसले, संबंधित कनिष्ठ अभियंता व कर्मचारी तसेच माजी नगरसेवक संजय वाबळे उपस्थित होते.
बैठकीत राजवाडा परिसर, जय गणेश साम्राज्य, लांडगे नगर, गुरुविहार कॉलनी तसेच सेक्टर १, ४, ६ आणि ९ मधील पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राजवाडा, जय गणेश साम्राज्य, लांडगे नगर, गुरुविहार कॉलनी आणि सेक्टर ९ मध्ये दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जलवाहिन्यांमधील गळती शोधून सांडपाणी मिसळणारे ठिकाण तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली.
सेक्टर ४, ६ आणि ९ मध्ये पाणीपुरवठ्याची निश्चित वेळ नसल्याने नागरिकांना मध्यरात्री किंवा भरदुपारी पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक निश्चित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. तसेच सेक्टर १ आणि ४ मध्ये मुख्य जलवाहिनीजवळील भागात पुरेसे पाणी मिळत असले, तरी शेवटच्या टोकावरील नागरिकांना पाणी मिळत नसल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. सेक्टर ४ आणि ९ मधील कमी दाबाची समस्या दूर करण्यासाठी जलवाहिन्यांचे प्रेशर ऑडिट आणि हायड्रॉलिक बॅलन्सिंग करण्याची मागणीही करण्यात आली.
प्रभागातील जुन्या जलवाहिन्यांचा तांत्रिक गोंधळ दूर करण्यासाठी संपूर्ण जलवाहिनीचे डिजिटल जीआयएस मॅपिंग करावे आणि आवश्यक ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकण्याबाबत तांत्रिक प्रस्ताव तयार करावा, अशी सूचनाही करण्यात आली. यावेळी नगरसेवक तुषार सहाणे म्हणाले, “नागरिकांना पुरेसे आणि शुद्ध पिण्याचे पाणी देणे हे महापालिकेचे प्राथमिक कर्तव्य आहे. पाणीपुरवठा विभागाकडे स्वतःच्या जलवाहिन्यांचे रेकॉर्ड नसणे किंवा कंत्राटदारांवर अवलंबून राहणे ही गंभीर बाब आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता येत्या दोन दिवसांत संपूर्ण तांत्रिक पाहणी पूर्ण करून नियमित दाबाने शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल.”
नगरसेविका अश्विनी वाबळे म्हणाल्या, “दूषित पाणी आणि मध्यरात्री-अपरात्री होणाऱ्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे गृहिणी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. नियमित पाणीपट्टी भरूनही नागरिकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत असेल, तर हा प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून गळती रोखावी आणि शेवटच्या टोकापर्यंत समान दाबाने पाणी पोहोचवावे.”
दरम्यान, शहर अभियंता मनोज सेठिया यांनी या सर्व समस्यांची गंभीर दखल घेत संबंधित तांत्रिक पथकाला प्रभागात प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन तातडीने सुरळीत करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता प्रभाग ८ मधील नागरिकांना दूषित आणि अनियमित पाणीपुरवठ्याच्या समस्येतून कधी दिलासा मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






