सारसबागेजवळ दोन दिवसांपासून उभ्या केलेल्या बंद कारमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह

पुणे – गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रस्त्याच्या कडेला बेवारस उभ्या असलेल्या एका बंद कारमध्ये ३० ते ३५ वयोगटातील तरुणाचा सडलेल्या आणि फुगलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना सारसबाग परिसरातील नेहरू स्टेडियमसमोर गुरुवारी (दि. २९) उघडकीस आली.
मृत तरुणाची ओळख पटली असून शुभम बनसोडे असे त्याचे नाव आहे. शुभम हा पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर एक कार (MH12 SF 5471)वाहन गेल्या दोन-तीन दिवसांपासून एकाच जागेवर उभे होते. गुरुवारी या कारमधून अचानक प्रचंड तीव्र दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे परिसरातील नागरिकांना संशय आला आणि त्यांनी तातडीने खडक पोलीस ठाण्याला यासंदर्भात माहिती दिली. माहिती मिळताच खडक पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारचा दरवाजा उघडून पाहिला असता, आतील सीटवर तरुणाचा मृतदेह अत्यंत फुगलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह २-३ दिवसांपासून बंद कारमध्येच पडून राहिल्यामुळे त्याची मोठी दुर्गंधी पसरली होती.
शुभम बनसोडे याचा मृत्यू नेमका कसा झाला? ही हत्या आहे की आत्महत्या? आणि त्याची कार नेहरू स्टेडियमसमोर कोणी आणून उभी केली? अशा अनेक प्रश्नांची उकल पोलिसांकडून केली जात आहे. पोलीस सध्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची बारीक पडताळणी करत आहेत. तरुणाच्या मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.






