पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू, एक जखमी

इंदापूर – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असताना अचानक माती आणि डबराचा मोठा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका २५ वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ३० वर्षीय मजूर जखमी झाला आहे. आज शुक्रवारी ( दि. ३०) सकाळी सुमारे दहा ते सव्वादहा वाजण्याच्या सुमारास राजवडी उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली.
मशरूबल शेख (वय २५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर नरीम रियाज उद्दीन अख्तर (वय ३०) हे जखमी झाले आहेत. हे दोघेही पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गालगत संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असताना अचानक माती आणि डबराचा मोठा ढिगारा कोसळला. त्यावेळी घटनास्थळी सहा कामगार उपस्थित होते. त्यापैकी तिघे चहा पिण्यासाठी गेले होते, तर उर्वरित कामगार बांधकामाच्या ठिकाणी काम करत होते. अचानक घडलेल्या या दुर्घटनेत दोन मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. क्षणात घटनास्थळी एकच धावपळ उडाली. सहकारी कामगार आणि स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर एका मजुराला ढिगाऱ्याबाहेर काढण्यात यश आले. प्रशासनाच्या माध्यमातून देखील बचाव कार्य सुरू होते. मात्र, दुसऱ्या मजुराला वाचविण्यात यश आले नाही. जखमी अवस्थेतील या मजुराला पुढील उपचारासाठी इंदापूर येथे पाठविण्यात आले.
या दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि दुर्घटनेची माहिती घेतली. संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असताना मातीचा एवढा मोठा ढिगारा अचानक कोसळण्यामागील नेमके कारण काय? कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? बांधकामस्थळी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन केले जात होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.






