रावेतमधील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला विरोध; नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचे आयुक्तांना निवेदन

रावेतमधील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला विरोध; नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचे आयुक्तांना निवेदन
Share

पिंपरी- रावेत परिसरातील सेक्टर २३ मधील सर्वे क्रमांक १५५, १५६, १५८ आणि १७७ येथे प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी विरोध दर्शविला आहे. प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी त्यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मोशी येथील विद्यमान वेस्ट टू एनर्जी प्रकल्प अद्याप अपेक्षित क्षमतेने आणि कार्यक्षमतेने सुरू झालेला नसताना आणखी एक प्रकल्प उभारणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मोशीतील प्रकल्पातील तांत्रिक अडचणी, कार्यप्रणालीतील त्रुटी, पर्यावरणीय परिणाम आणि कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न पूर्णपणे निकाली निघालेले नाहीत. त्यामुळे आधीच्या प्रकल्पातील समस्या सोडवून तो सुरक्षित व कार्यक्षम पद्धतीने सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. रावेत परिसराच्या आसपास संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ऑर्डनन्स फॅक्टरी आणि देहूरोड येथील दारूगोळा कारखाना आहे. हा परिसर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने प्रस्तावित प्रकल्पापूर्वी संरक्षण विभागाची भूमिका, सुरक्षा व संभाव्य धोक्यांचा अभ्यास करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

रावेत परिसरात ऐतिहासिक दुर्गा टेकडी, निवासी वसाहती, शैक्षणिक संस्था आणि मोठी लोकवस्ती आहे. प्रकल्पामुळे वायुप्रदूषण, दुर्गंधी, ध्वनीप्रदूषण, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा अभ्यास आवश्यक असल्याचे तरस यांनी नमूद केले.प्रकल्पाची प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, मोशीतील प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतरच नवीन प्रकल्पाचा विचार करावा, तसेच स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, पर्यावरणतज्ज्ञ आणि संरक्षण विभागाशी चर्चा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रकल्पाचा स्वतंत्र पर्यावरणीय व सामाजिक परिणाम अहवाल (EIA) सार्वजनिक करून नागरिकांच्या हरकती व सूचना मागवाव्यात, अशीही मागणी आहे. नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण, सुरक्षा आणि जनहिताचा विचार करून प्रस्तावित प्रकल्प रद्द करावा, असे निवेदनात म्हटले आहे. मागण्यांचा गांभीर्याने विचार न झाल्यास जनआंदोलन उभारले जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

Vedh News