राजगुरूनगरजवळ खेड घाटात पैसे मागण्यावरून तृतीयपंथी आणि वाहनातील प्रवाशांमध्ये ‘दे दणादण’
राजगुरूनगर – पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरूनगर जवळील खेड घाट परिसरात पैसे मागण्याच्या कारणावरून तृतीयपंथी आणि वाहनातील प्रवाशांमध्ये हाणामारी झाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २३) रात्री घडली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे येथील जीवन जावळे सांडभोरवाडी फाट्याजवळ लघुशंकेसाठी थांबलेले असतांना या ठिकाणी असलेल्या तृतीयपंथीयांशी त्यांची बाचाबाची झाली. यामध्ये अन्नू दाभाडे, मुन्नी दाभाडे, सान्वी दाभाडे, तन्वी सिंग यांनी दगडाने मारहाण करून डोक्याला दुखापत केल्याचा आरोप जावळे यांनी केला आहे. तस्सेच वाहनात बसलेल्या विशाल भोसले यांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या ओढल्याचा आणि वाहनावर दगड फेकून नुकसान केल्याची तक्रार करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांनी देखील मारहाण आणि विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.
दोन्ही बाजूनी परस्पर विरोधी तक्रारी आल्यामुळे नेमकी कशी घटना घडली याचा तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण करत आहेत.
