पिंपरी चिंचवड शहरांत फेरीवाला क्षेत्र निश्चित, १५ हजार पात्र फेरीवाल्याना प्रमाणपत्राचे वाटप

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) शहरातील रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय व प्रभागांमध्ये पात्र फेरीवाल्यांना अधिकृत प्रमाणपत्र आणि ओळखपत्र वाटपास सुरुवात केली आहे.
पिंपरी चिंचवडमधील पात्र फेरीवाल्यांना अ व क क्षेत्रीय कार्यालयात बुधवारी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम झाला. यावेळी क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घागरे व अजिंक्य येळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी काशिनाथ नखाते, किरण साडेकर, राजू बिराजदार, अलका रोकडे, सलीम डांगे, इरफान चौधरी, बालाजी लोखंडे, सलीम शेख, नंदू आहेर, रज्जाक शेख, सुनील भोसले, सहदेव होनमने, सुखदेव नांगरे, इकबाल शेख, विशाल इचके, लक्षण सागर, ज्योती ढाकरे, अशोक पगारे, अनिता कुमार, सुषमा सागर आदी उपस्थित होते.
मागील चार वर्षांपासून रखडलेल्या फेरीवाला क्षेत्र निर्मिती व प्रमाणपत्र वाटपाच्या मागणीसाठी फेरीवाला महासंघाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यानंतर ही मोहीम सुरू झाली आहे. २०२२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात शहरात १९,७९२ फेरीवाले आढळले होते, त्यापैकी कागदपत्रांच्या छाननीनंतर १५,०१३ फेरीवाले पात्र ठरले आहेत. नोंदणीसाठी १,००० रुपये आणि ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी प्रत्येकी २०० रुपये असे एकूण १,४०० रुपये शुल्क आकारले जात आहे.
शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रेल्वे आणि बस स्थानक परिसर सोडून अन्य ठिकाणी हॉकर्स झोन व फेरीवाला क्षेत्र निश्चितीची कार्यवाही केली जात आहे. अखेर चार वर्षांनंतर शहरातील पथविक्रेता धोरणाला दिशा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.






