‘इंस्टाग्राम’वर तरुणीच्या नावाने बनावट खाते तयार करून, फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्याला अटक

पिंपरी- ‘इंस्टाग्राम’वर तरुणीच्या नावाने बनावट खाते तयार करून त्या माध्यमातून एका तरुणाचे खासगी फोटो मागवले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘इंस्टाग्राम’वर तरुणीच्या नावाने बनावट खाते तयार करून त्या माध्यमातून एका तरुणाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर त्याचे खासगी फोटो मागवले. फिर्यादी आपल्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच हे फोटो नोकरीच्या ठिकाणी तसेच इतर ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच फिर्यादीच्या मैत्रिणीशी व्हाट्सअपवर संपर्क साधून तिच्याकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. अन्यथा मित्राला जीवे मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकाराला त्रस्त झालेल्या तरुणाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस चौकीत गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून त्याला जेरबंद केले. आरोपीकडून १ लाख ४ हजार १३० रुपये किमतीची दुचाकी, मोबाईल, आधारकार्ड, पाकीट इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीच्या विरोधात अशाच प्रकारचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.






