दोन कामगारांच्या मृत्यू प्रकरणी शॅफलर इंडिया कंपनीचे सीईओ हर्षा कदम पोलिसांच्या ताब्यात

पुणे – तळेगाव एमआयडीसीतील कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी ऑटोमोबाईल आणि औद्योगिक सुटे भाग बनवणाऱ्या शॅफलर इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हर्षा गोपाळ कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (१९ ऑक्टोबर) कदम यांना ताब्यात घेतले.
९ जून २०२६ रोजी पुण्यातील तळेगाव येथील शॅफलर इंडियाच्या कारखान्यात एक भीषण दुर्घटना घडली होती. येथे नियोजित सिलिंडर बदलण्याचे काम सुरू असताना अचानक कार्बन डायऑक्साईड (CO₂) वायूची गळती झाली. या गॅस गळतीमुळे दोन कंत्राटी कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता.
कारखाना सुरक्षिततेशी संबंधित कायद्यांनुसार हर्षा कदम हे संबंधित कारखान्याचे कायदेशीर ‘ऑक्युपायर’ (कारखान्याच्या कामकाजावर अंतिम नियंत्रण असलेली जबाबदार व्यक्ती) म्हणून नोंदणीकृत आहेत. त्यामुळे कारखान्यातील सुरक्षिततेबाबत त्यांच्या जबाबदारीचीही चौकशी करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, यापूर्वी सहा अधिकारी आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, शॅफलर इंडियाने या प्रकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी तपास यंत्रणांना सहकार्य करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
व्यवस्थापकीय संचालकांना ताब्यात घेतल्यानंतरही कंपनीचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वरिष्ठ व्यवस्थापनाकडून कंपनीचे नियमित व्यवहार आणि उत्पादनाशी संबंधित कामकाज पाहिले जात असल्याचे कंपनीने सांगितले.






