दुपारी २ वाजेपर्यंत पदवीधर मतदारसंघात ३९.७९ टक्के, तर शिक्षक मतदारसंघात ४९.५४ टक्के मतदान

पुणे- विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज (दि. २३) सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी ४ वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. पदवीधर मतदारसंघासाठी ४७ तर शिक्षक मतदारसंघासाठी ३० उमेदवार रिंगणात आहेत.
दुपारी दोन वाजेपर्यंत पदवीधर मतदारसंघात ३९.७९ टक्के, तर शिक्षक मतदारसंघात ४९.५४ टक्के मतदान झाले होते. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी एकूण १६० मतदान केंद्रे असून, या मतदारसंघात ८८ हजार २०२ मतदार आहेत. त्यापैकी दुपारी दोन वाजेपर्यंत ३५ हजार १४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २४ हजार २१८ पुरुष आणि १० हजार ९२७ महिला मतदारांचा समावेश आहे. पुरुष मतदारांपैकी ४२.५८ टक्के, तर महिला मतदारांपैकी ३४.७४ टक्के मतदारांनी मतदान केले. एकूण मतदानाची टक्केवारी ३९.७९ इतकी होती.
शिक्षक मतदारसंघासाठी ७२ मतदान केंद्रे असून, एकूण १६ हजार ८२२ मतदार आहेत. त्यापैकी दुपारी दोन वाजेपर्यंत ८ हजार ३३४ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ४ हजार ५११ पुरुष आणि ३ हजार ८२३ महिला मतदारांचा समावेश आहे. पुरुष मतदारांपैकी ५३.७१ टक्के, तर महिला मतदारांपैकी ४५.३९ टक्के मतदारांनी मतदान केले. एकूण मतदानाची टक्केवारी ४९.५४ टक्क्यांवर पोहोचली होती.
या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव आणि महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव यांनी आपला मतदानाचा हक्क बजावून विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.
मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “या निवडणुकीचा खरा केंद्रबिंदू पदवीधर मतदार आहेत. सुशिक्षित आणि सुजाण असलेल्या पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला ही संधी मिळाली असून माझ्या विजयाची मला पूर्ण खात्री आहे. सध्या वाढती महागाई आणि बेरोजगारीचे चटके सर्वसामान्य व पदवीधरांना बसत आहेत, त्यामुळे सुजाण मतदार योग्य तोच निर्णय घेईल. प्रचाराच्या सुरुवातीलाच मला शरद पवार साहेबांचा आशीर्वाद मिळाला होता. कोल्हापूरमध्ये जसा विजयाचा गुलाल उधळला गेला, तसाच गुलाल आता निकालाच्या दिवशी म्हणजेच २७ तारखेला पुन्हा उधळला जाईल.”






