आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी देणारा लोणीकंद मधून ताब्यात

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शप) आमदार जितेंद्र आव्हाड यांना दूरध्वनी करून धमकाविणाऱ्या एकाला लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी त्याला नोटीस बजावली असल्याची माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली.
विशाल माधवराव बिच्चेवाड (वय ३९, रा. बारावा मैल, लोणीकंद) असे या इसमाचे नाव असून तो लोणीकंद परिसरात भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहात असूनसुरक्षारक्षक म्हणून काम करतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिच्चेवाड याने १९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री आव्हाड यांना संदेश पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली. बिच्चेवाडने आव्हाड यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून शिवीगाळ करत तुझ्या घराच्या दारात आलो आहे. आत सोडायला सांग. तुला गोळ्या घालतो, अशी धमकी दिली. आव्हाड यांनी याबाबत त्वरित ठाणे येथील वर्तकनगर पोलिसांत माहिती देऊन प्रसारमाध्यमांना कळविले.
दूरचित्रवाहिनीवर आमदार आव्हाड यांनी स्वतः ही बाब प्रसारमाध्यमांना दिली. ही बातमी घरमालकाने पाहताच आपल्याकडे भाडेकरू म्हणून राहणाऱ्या विशालचेच हे काम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित बिच्चेवाड याला पोलिसांच्या ताब्यात दिले. लोणीकंद पोलिसांनी त्याला ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ठाणे पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे.






