शिरूर- शिरूर शहरातील आंबेडकर नगर लगतच्या लाटेआळी परिसरात एका तरुणावर पहाटे साडेसहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही थरारक घटना जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हरी गंगावणे (वय २५ वर्षे) असे गोळीबारात ठार झालेल्या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे.
नेहमीप्रमाणे आज शुक्रवारी सकाळी शहर हळूहळू जागे होत असतानाच सुमारे साडेसहाच्या सुमारास लाटेआळी भागात अचानक बंदुकीच्या गोळ्यांचा मोठा आवाज आला. या आवाजांनी परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेत पहिले असता हरी गंगावणे गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी शिरूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले तसेच पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह मोठा फौजफाटा काही वेळातच घटनास्थळी दाखल झाला. तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पुरावे म्हणून घटनास्थळावरून रिकामी काडतूसं गोळा करण्यासाठी तज्ज्ञ फॉरेन्सिक पथक देखील घटनास्थळी दाखल झाले.
हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात केली आहेत. तसेच, आरोपी ज्या मार्गाने पळून गेले त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला जुन्या पूर्ववैमनस्यातून किंवा वादातून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शिरूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
