ब्रेकिंग न्यूज

‘पुणे गणेशोत्सव डॉट कॉम’द्वारे गणेश भक्तांना मिळणार एकाच ठिकाणी मंडळापासून पार्किंगपर्यंत सर्व माहिती

Share

पुणे- पुण्यात येणाऱ्या भाविकांना गणेशोत्सवातील प्रमुख मंडळे, त्यांचा इतिहास, भेटीचे मार्ग, जेवणाची ठिकाणे, पार्किंगपासून आपत्कालीन सुविधांपर्यंत आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नगरसेवक कुणाल टिळक यांनी ‘पुणे गणेशोत्सव डॉट कॉम’ ही वेबसाईट सुरू केली असून या माध्यमातून पुण्याच्या गणेशोत्सवाचा अनुभव अधिक सोपा आणि नियोजनबद्ध होण्यास मदत होणार आहे.

पुण्यातील सुमारे ५० ते ६० गणेश मंडळांचा थोडक्यात इतिहास या वेबसाईटवर देण्यात आला आहे. मानाचे पाच गणपती पाहण्यासाठी प्री-सेट रूट्सची सुविधाही उपलब्ध आहे. संबंधित पर्यायावर क्लिक केल्यानंतर थेट गुगल मॅप्सच्या माध्यमातून भाविकांना मार्ग पाहता येतो. याशिवाय आपल्या सुरुवातीच्या ठिकाणानुसार आवडत्या गणेश मंडळांचा मार्ग स्वतः तयार करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

गणेशोत्सवासाठी पुण्याच्या मध्यवर्ती भागात येणाऱ्या भाविकांना पार्किंगची ठिकाणे, प्रसिद्ध खाद्यपदार्थ व जेवणाचे स्पॉट्स, मेट्रो स्थानके आणि बस स्थानकांची माहितीही वेबसाईटवर मिळणार आहे. तसेच रुग्णालये, पोलीस ठाणी आणि आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी ठरणारी एसओएस सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकमान्य टिळकांच्या खापरपणतू म्हणून गणेशोत्सवाची परंपरा आणि इतिहास नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे कुणाल टिळक यांनी सांगितले. यंदा वेबसाईट प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आली असून, नागरिकांच्या अभिप्रायानुसार पुढील वर्षी त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत.