ब्रेकिंग न्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उपअभियंता निलंबित

Share

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पुनावळे भागातील निवासी आणि व्यावसायिक इमारतींच्या भोगवटा प्रमाणपत्राच्या संदर्भातील प्रशमन शुल्कात तफावत व आर्थिक गैरव्यवहार आढळल्याने बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता विजय सोनावणे आणि उपअभियंता अशोक मोरे यांना निलंबित करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका बांधकाम परवानगी प्रक्रियेत गैरव्यवहार झाला असून सहशहर आणि कार्यकारी अभियंता पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी पैसे मागत आहेत अशी तक्रार भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या तक्रारीनुसार मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश आयुक्तांना दिले होते. त्यानुसार दोन्ही अधिकाऱ्यांना करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

पुनावळे येथील निवासी व वाणिज्य इमारतींच्या बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्रासाठी (OC) आकारण्यात येणाऱ्या ‘अ’ आणि ‘ब’ प्रपत्राच्या रकमेत तफावत आढळून आल्यामुळे विजय सोनावणे आणि उपअभियंता अशोक मोरे यांच्याकडून खुलासा मागवला होता. त्याचा खुलासा समाधानकारक आणि समर्पक नसल्याचे विभागप्रमुखानी कळवल्यानंतर त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.

नगरसेवक तुषार हिंगे यांचे आरोप

नगरसेवक तुषार हिंगे यांनी सहशहर अभियंता सुनील भागवानी आणि कार्यकारी अभियंता विजय सोनवणे यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. ‘‘त्यांच्याकडून बांधकाम परवानगीसाठी फायलींमध्ये जाणीवपूर्वक तांत्रिक त्रुटी काढून मंजुरी लांबविली जाते. त्यानंतर फायली पुढे नेण्यासाठी चौरस फुटानुसार आर्थिक मागणी केली जाते. पैसे न दिल्यास मंजुरीची प्रक्रिया रेंगाळत ठेवली जाते. विकास प्रकल्पांतील मूळ नकाशे, रस्ते किंवा मंजूर आरक्षणांचा मुद्दा पुढे करून बांधकाम व्यावसायिकांची मानसिक व आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचाही आरोप तुषार हिंगे यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांची बदली करून त्यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी हिंगे यांनी केली होती.