ब्रेकिंग न्यूज

स्वच्छ वायू सर्वेक्षण : पुणे देशात १२ व्या क्रमांकावर, तर खराडी-वाघोली आणि गोखलेनगर-औंध या प्रभागांना राज्यस्तरावर विशेष मान्यता

Share

पुणे- केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६ (नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम – NCAP) अंतर्गत दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात पुण्याने २०० पैकी १८३ गुण मिळवून राष्ट्रीय स्तरावर बारावा क्रमांक पटकाविला आहे. तर स्थानिक कामगिरीमध्ये पुण्यातील प्रभाग ४ (खराडी-वाघोली) आणि प्रभाग ७ (गोखलेनगर-औंध) यांना राज्यस्तरावर विशेष मान्यता मिळाली आहे.

‘एनसीएपी’तर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले. स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६ अंतर्गत वायुप्रदूषण नियंत्रणासाठी शहरांनी केलेल्या उपाययोजना, शहर कृती आराखड्याची अंमलबजावणी, रस्त्यावरील धूळ नियंत्रण, बांधकामांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी केलेले प्रयत्न, बांधकाम कचरा व्यवस्थापन , वाहन व औद्योगिक उत्सर्जनावरील नियंत्रण, कचरा व्यवस्थापन आणि जनजागृती अशा विविध निकषांवर शहरांचे मूल्यमापन करण्यात आले.

महाराष्ट्रातील इतर शहरांपैकी ठाणे शहराने देशात सातवे स्थान मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच नवी मुंबई नवव्या आणि नागपूर दहाव्या स्थानी आहे. मुंबई २८ व्या क्रमांकावर आहे. वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी, मेट्रो व पायाभूत प्रकल्पांची बांधकामे, रस्त्यांवरील धूळ, बांधकाम साहित्याची वाहतूक, काही भागांतील औद्योगिक उत्सर्जन सूक्ष्म धुलिकण (पीएम १०) आणि अतिसूक्ष्म धुलिकणांचे (पीएम २.५) प्रमाण कमी करणे हे भविष्यातील पुण्यासमोरील आव्हाने असणार आहेत.