ब्रेकिंग न्यूज

नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याचे समजताच पत्नीची आत्महत्या ; कोथरूड मधील दुर्दैवी घटना

Share

पुणे- लग्न होऊन जेमतेम काही महिने होताच आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे समजताच अवघ्या २५ वर्षांच्या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोनाली गोविंद पवार असे मृत विवाहितेचे नाव असून, तिचा पती गोविंद पवार याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबतची माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वीच सोनाली आणि गोविंद यांचा विवाह पार पडला होता. विवाहानंतर सुरुवातीचे दिवस चांगले गेले. मात्र काही महिन्यातच आपल्या पतीचे दुसऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचे सोनालीच्या लक्षात आले. गोविंद हे संबंध तोडण्यास तयार नव्हता. त्यावरून दोघांमध्ये रोज वादविवाद, भांडणे होऊ लागली.

आपली चूक मान्य करण्याऐवजी गोविंदने सोनालीवरच राग काढण्यास सुरुवात केली. तिच्यावर सतत संशय घेणे, शिवीगाळ करणे आणि किरकोळ कारणावरून मारझोड करणे, असे प्रकार दिवसेंदिवस वाढले होते. अखेर या त्रासाला कंटाळून सोनालीने 22 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास, सुतारदरा येथील लेन क्रमांक 29 मधील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

घरात परतलेल्या कुटुंबीयांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केलं. कोथरूड पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. मृत तरुणीच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पतीच्या सततच्या छळाला आणि विवाहबाह्य संबंधांना कंटाळूनच तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी गोविंद पवार याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला असून, कोथरूड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.