ब्रेकिंग न्यूज

पिंपरी चिंचवड शहरात धावणार ‘ई-आरटीएस’ ; स्पाईन रोड ते वाकड दरम्यान पहिल्या टप्प्याला मंजुरी

Share

पिंपरी – शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडी यावर मात करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात सार्वजनिक वाहतुकीचा आधुनिक पर्याय म्हणून ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) मार्ग प्रस्तावित केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, शहरात लवकरच ‘ई-आरटीएस’ धावतील.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वीच सर्वपक्षीय नगरसेवकांना या प्रकल्पाचे प्रेझेंटेशन दाखवण्यात आले होते. तसेच प्रकल्पाचे महत्त्व, तांत्रिक बाजू, खर्च आणि शहराला होणारा फायदा या सर्व बाबी नगरसेवकांना आधीच पटवून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुख्य सभेमध्ये कोणत्याही प्रकारच्या चर्चेशिवाय या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली.

शहरातील वाहतूक कोंडीची तीव्र समस्या लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यासाठी मोशीतील स्पाईन रोड ते वाकड या साधारण १७ किलोमीटर अंतराच्या मार्गाची निवड करण्यात आली आहे. हा मार्ग शहरातील अनेक महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या भागांना जोडणारा ठरणार आहे. हिंजवडी आयटी पार्क आणि चाकण औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या मध्यवर्ती पट्ट्यातून हा मार्ग जात असल्याने, नोकरदार वर्ग आणि स्थानिक नागरिकांचा प्रवासाचा वेळ कमालीचा वाचणार आहे.

काय आहे ई-आरटीएस तंत्रज्ञान ?

ई-आरटीएस म्हणजे इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम. हा सार्वजनिक वाहतुकीचा अत्यंत आधुनिक आणि पर्यावरणपूरक प्रकार आहे. मेट्रोच्या तुलनेत या प्रकल्पाचा खर्च अत्यंत कमी असतो, तर बीआरटीएस पेक्षा ही यंत्रणा अधिक वेगवान आणि शिस्तबद्ध मानली जाते. यामध्ये विजेवर चालणाऱ्या अत्याधुनिक रबर टायरच्या बसेस किंवा ट्रामसारखी वाहने एका समर्पित लेनमधून धावतात. प्रदूषणमुक्त प्रवास आणि कमी खर्चात जलद वाहतूक ही या वाहतूक प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.