ब्रेकिंग न्यूज

रिक्षात शेजारी बसून हातचलाखीने दागिने लांबवणारी टोळी जेरबंद

Share

पुणे -रिक्षातून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या जवळ बसून हातचलाखी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा समर्थ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जळगावहून पुण्यात येऊन धुमाकूळ घालणाऱ्या या टोळीतील तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल १५ लाख रुपये किमतीचे १० तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

या प्रकरणी शाकीर जाकीर तेली (वय २९, रा. कात्रज), मोहसीन खान नूर खान (वय ३१, रा. जळगाव) आणि इस्माईल उर्फ राजू शब्बीर शेख (वय ५०, रा. जळगाव) या आरोपीना अटक करण्यात आली असून त्यांचा साथीदार गणेश उर्फ मेमरी याचा पोलीस शोध घेत आहेत.

१४ जून रोजी एक ज्येष्ठ महिला पॉवर हाऊस चौक ते भवानी पेठ दरम्यान ऑटोरिक्षाने प्रवास करत होत्या. त्यावेळी रिक्षात प्रवासी बनून बसलेल्या या भामट्यांनी संगनमत करून अत्यंत चलाखीने महिलेच्या गळ्यातील २५ ग्रॅमची सोनसाखळी लांबवली. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, जळगावची ही सराईत गँग पुण्यात येऊन रिक्षाप्रवासादरम्यान वृद्धांना लुटण्याचे काम करत आहे. पोलिसांनी सापळा रचून शाकीर तेली याला कात्रजमधून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने जळगावच्या आपल्या साथीदारांची नावे सांगितली.

दरम्यान, २ सप्टेंबर रोजी मोहसीन खान आणि इस्माईल शेख हे दोघे पुन्हा चोरीच्या उद्देशाने मालधक्का चौकात आले असताना पोलिसांनी घेराव घालून त्यांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी या टोळीची कसून चौकशी केली असता त्यांनी पुणे शहरातील सिंहगड रस्ता, काळेपडळ, वानवडी, बंडगार्डन तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात रिक्षातून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांना लुटल्याची कबुली दिली आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहाय्यक आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली आहे.