पुणे- सरकारी नोकरीतील ५ टक्के क्रीडा आरक्षणाचा (Sports Quota) बेकायदेशीर लाभ घेण्यासाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्रे तयार करणाऱ्या एका मोठ्या राज्यव्यापी रॅकेटचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नगर (वय ४६, रा. फुरसूंगी, मूळ कोल्हापूर )आणि सचिव शिवाजी साळुंखे (वय ४० रा. चंदीगड मूळ अहिल्यानंगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्याशिवाय असोसिएशनच्या अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. मागील १० वर्षात ‘कुराश’ खेळाची तब्बल १५०० हुन अधिक बनावट प्रमाणपत्र वाटली गेल्याचा संशय आहे.
तपासादरम्यान, ‘कुराश’च्या काही स्पर्धा प्रत्यक्ष झाल्या असून काही स्पर्धा केवळ कागदोपत्री दाखवण्यात आल्याचा संशय आहे. पोलीस आता प्रत्येक प्रमाणपत्राची स्वतंत्रपणे तपासणी केली जाणार आहे. सपर्धा कुठे झाली, कधी झाली, त्यामध्ये कोण सहभागी झाले होते, निकाल काय होता, आणि प्रमाणपत्र देताना कोणती प्रक्रिया राबवण्यात आली याचा सखोल तपास करण्यात येणार आहे.
संशयितांनी गेल्या १० ते ११ वर्षांत १,००० ते १५०० हून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटल्याचा संशय आहे. प्रामुख्याने ‘कुराश’ (Kurash – मध्य आशियाई कुस्तीचा प्रकार) आणि ‘ड्रॅगनबोट’ (Dragon Boat) या खेळांच्या नावाखाली कोणतीही प्रत्यक्ष स्पर्धा आयोजित न करता केवळ कागदावर स्पर्धा दाखवून ही प्रमाणपत्रे विकली गेली. प्रत्येक बोगस प्रमाणपत्रासाठी उमेदवारांकडून ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम उकळण्यात आल्याचा संशय आहे.
या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे तब्बल १९ उमेदवारांनी पुणे शहर पोलीस दलात खेळाडू आरक्षणाचा लाभ घेत पोलीस शिपाई म्हणून नोकरी मिळवली होती. हे सर्व उमेदवार सध्या प्रशिक्षण घेत असून, त्यांची प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि त्यांच्या नोकऱ्या जाण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय वर्ग १ आणि वर्ग २ च्या शासकीय पदांसाठीही अशा प्रमाणपत्रांचा वापर झाल्याचा संशय आहे.
आरोपींनी जुन्या तारखांमध्ये (उदा. २०१६ ते २०१९ दरम्यान) राज्यस्तरीय स्पर्धा झाल्याचे दाखवून बनावट कागदपत्रे आणि क्रीडा पडताळणी अहवाल तयार केले होते. मात्र, ही प्रमाणपत्रे बनवताना आरोपींनी गंभीर चुका केल्या, ज्यावरून पोलिसांचा संशय बळावला. २०१६-१७ च्या प्रमाणपत्रांवर अधिकृत नामांतरापूर्वीच ‘उस्मानाबाद’ ऐवजी ‘धाराशिव’ आणि ‘औरंगाबाद’ ऐवजी ‘छत्रपती संभाजीनगर’ अशा नवीन नावांचा उल्लेख करण्यात आला होता. महिलांच्या ४४ किलो वजनी गटाच्या क्रीडा निकालात थेट एका पुरुष खेळाडूचे नाव नोंदवले गेल्याचे समोर आले आहे. प्रमाणपत्रांवर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या स्कॅन करून हुबेहूब उमटवण्यात आल्या होत्या.
पुणे पोलिसांच्या अप्पर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. या रॅकेटची पाळेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली असून, क्रीडा विभागाचे अधिकारी, विविध क्रीडा संघटनांचे जिल्हा पदाधिकारी आणि एजंट (दलाल) यांची चौकशी केली जात आहे. तसेच, इतर शासकीय विभागांमध्ये क्रीडा कोट्यातून नोकरी मिळवलेल्या ५०० ते ६०० संशयित उमेदवारांची आणि त्यांच्या प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
