पिंपरी – वाकड आणि पुनावळे येथील स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच गीत फुलोरा काव्य गायनाच्या कार्यक्रमाच्या २२ व्या वर्षानिमित्त अकॅडमीचे संचालक अभय कुलकर्णी यांच्या ‘कागदाची होडी’ या बालगीताचे लोकार्पण बालभारती कलाशिक्षण विभाग प्रमुख डॉ. अजयकुमार लोळगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष पं. बाळासाहेब सूर्यवंशी, सचिव पं. सुधाकर चव्हाण, पदाधिकारी क्षमा गोडसे, संध्या केळकर, सुरभी ब्युटी अकॅडमीच्या संचालिका श्रुती मनवेलीकर तसेच स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीचे संचालक अभय कुलकर्णी, अर्पिता कुलकर्णी आणि अथर्व कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी – पालकांची उपस्थिती होती.
स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीचे संचालक अभय कुलकर्णी यांच्या ‘कागदाची होडी’ या बालगीताचे लोकार्पण बालभारती कलाशिक्षण विभाग प्रमुख डॉ. अजयकुमार लोळगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. लोळगे म्हणाले की ‘कागदाची होडी हे गीत प्रत्येकाच्या बालपणातला उजाळा देणारे असून लहान होऊन जगता आले पाहिजे. सुमारे बावीस वर्षापासून कवितेवर कार्यक्रम करणारे हे जोडपे खूप भावले. यापुढेही बालभारती गीत फुलोरा उपक्रमाची नक्कीच दखल घेईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
स्वरोपासनाच्या शंभर विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये राग गायनासह विविध गीतांच्या माध्यमातून सलग दहा तासांचे संगीतमय सादरीकरण केले. ‘जय जगदीश हरे’ तसेच सरस्वती स्तवन गाऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध रागदारी आणि शेवटी विविध गीतांचे सादरीकरण असे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी संयोजित केलेला होता. निवेदनापासून ते वेशभूषेपर्यंत सर्व जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडली. संचालिका अर्पिता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अथर्व कुलकर्णी यांनी आभार मानले. औपचारिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा पाटील यांनी केले; तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी पार पाडले.
