पुणे- दहीहंडी उत्सवात विनापरवाना कार्यक्रमाचे आयोजन केल्या प्रकरणी बिबवेवाडीतील एका मंडळाच्या अध्यक्षांसह लावणी नृत्यांगना राधा पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अश्लील हावभाव राधा पाटीलने केल्याची टीका होत आहे. त्यातच, कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती.
यंदाच्या दहीहंडी उत्सवात गौतमी पाटील, बिग बॉस फेम राधा पाटीलच्या नृत्याविष्काराने मुंबई आणि पुणेकर घायाळ झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु, पुण्यातील राधा पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कार्यक्रमाचा आयोजन केल्या प्रकरणी बिबवेवाडीतील एका मंडळाच्या अध्यक्षांसह राधा पाटीलच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहीहंडी कार्यक्रमात कार्यक्रम सादर करताना अश्लिल नृत्य सादर होऊ नये, यासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली होती. या आदेशानुसार प्रमाणपत्र सादर न केल्याने मंडळाला कार्यक्रमाची परवानगी नाकारली होती. राधाच्या अदांनी पुणेकर चाहते घायाळ झाले, राधाचे नृत्यही इंस्टावरुन व्हायरल झाले असून या नृत्यात अश्लील हावभाव केल्याचा आरोपही काही जणांकडून होत असून सोशल मीडियावर तशा कमेंटही पाहायला मिळत आहेत.
पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
