ब्रेकिंग न्यूज

‘आयटी’चे ज्ञान वापरून पीएमपी बसमधून ‘ऐटी’त फुकट प्रवास, तरुणावर गुन्हा दाखल

Binai i
Share

पुणे- एका महाविद्यालयात इन्फॉरमेशन टेक्नोलॉजीमध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुणाने आपल्या शिकत असलेल्या गोष्टींचा उपयोग करुन चक्क पीएमपीसारखे अ‍ॅप तयार केले. या ऍपद्वारे दैनंदिन पास तयार करुन तो पीएमपी बसमधून प्रवास करत असे. पण त्याचे हे बिंग एका चाणाक्ष वाहकाने फोडले आणि कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात दिले.

प्रथमेश लक्ष्मण बोगे (वय २०, रा. रेड क्लीफ शाळेजवळ, चर्‍होली) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीएमपीचे सहायक डेपो मॅनेजर रामदास दुंदाजी विरनक यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ३० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भेकराईनगर ते आळंदी या बसमधून प्रवास करणार्‍या या तरुणाने रुबी हॉल बसस्थानकावर बस कंडक्टर दत्तात्रय जायभाये यांना दैनंदिन पास दाखविला. त्यात काहीतरी चुकीचे असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांनी त्याची तक्रार आगार प्रमुखाकडे केले. फिर्यादी विरनक यांनी बोगे याची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर दिघी पोलिसांनी प्रथमेश बोगे याला समज देऊन दुसर्‍या दिवशी स्वारगेट येथील पीएमपी मुख्यालयात बोलवले. त्याप्रमाणे तो पीएमपी मुख्यालयात आला.

त्याच्या मोबाईलमधील पीएमपी अ‍ॅपची तांत्रिक तपासणी केली. पीएमपी अधिकृत मोबाईल अ‍ॅप्लीकेशनमध्ये दर दिवशी जे पासने प्रवास करतात. त्या पासचे बॅकग्राऊंडला प्रत्येक दिवशी एक कलर निश्चित करुन दिला जातो. प्रथमेश बोगे याच्या पासवर ३० ऑगस्ट रोजी पीएमपीने निश्चित केलेला कलर वेगळा होता. त्यावरुन त्याचा पास डुप्लिकेट असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर तो एका नामवंत इन्फॉरमेशन टेक्नोलॉजी कॉलेजमध्ये शिकत आहे. त्याला कोडींग व प्रोग्रॉमिंगचे ज्ञान असल्याने ते वापरुन त्याने हे अ‍ॅप्लीकेशन स्वत: बनवल्याचे सांगितले. ते अ‍ॅप्लिकेशन मार्च २०२५ पासून त्याच्याकडे आहे. जेव्हा प्रवासासाठी पैसे नसतात. तेव्हा ते वापरतो, असे सांगितले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.