पुणे – केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करून मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यानंतर आणखी एका तरुणाला अटक केली आहे. या हत्याकांडात झालेली ही तिसरी अटक असून, कट माहीत असूनही पोलिसांपासून लपवून ठेवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
रितेश हांगे असे या तरुणाचे नाव असून हा सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचा वर्गमित्र असल्याची माहिती आहे. रितेशला चेतन आणि सियाने रचलेल्या संपूर्ण कटाची कल्पना आधीपासूनच होती. १८ जून रोजी केतनला संपवण्यासाठी दोघांनी रितेशलाही लोहगडावर सोबत येण्याची गळ घातली होती; मात्र त्याने प्रत्यक्ष जाणे टाळले. गुन्हा घडल्यानंतरही तो आरोपींच्या सातत्याने संपर्कात होता. स्वतःचा सहभाग लपवण्यासाठी त्याने चेतनसोबत झालेले व्हॉट्सॲप संभाषण डिलिट केले होते. मात्र, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पोलिसांनी हे चॅट्स रिकव्हर करताच या गुन्ह्यातील रितेशचा चेहरा समोर आला.
रितेश हांगे हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरात एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. तिघेही एकाच वर्गात शिकत असल्याने त्यांच्यात घट्ट मैत्री होती. पोलिसांनी त्याला वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
