ब्रेकिंग न्यूज

चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते व वाहतूक सुविधांच्या कामांना गती द्या, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सूचना

Share

चाकण – चाकण औद्योगिक क्षेत्र परिसरातील कंपनीच्या स्थलांतराच्या अनुषंगाने तसेच औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज चाकण औद्योगिक क्षेत्रातील विविध रस्त्यांची संयुक्त पाहणी केली. यावेळी एमआयडीसी अंतर्गत रस्ते, तळेगाव-चाकण महामार्ग तसेच पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची पाहणी करताना रस्त्यांवरील आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ज्या ठिकाणी रस्त्यांचे काँक्रिटीकरण अपूर्ण आहे, त्या ठिकाणी उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत. कामे करताना औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक विस्कळीत होणार नाही, यासाठी वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील टप्पा क्रमांक पाचमध्ये कॉर्निंग कंपनीपासून पुणे-नाशिक महामार्गाकडे जाणाऱ्या उर्वरित रस्त्याच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. या रस्त्याच्या कामात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्यांचे निराकरण करून काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक त्या ठिकाणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या स्तरावरून आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थेला मोठी मदत होणार असून, कंपन्यांची वाहतूक तसेच मालवाहतूक अधिक सुलभ होण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे प्रलंबित बाबींचे तातडीने निराकरण करून कामाला गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

तळेगाव-चाकण महामार्गावरील खराब रस्त्याच्या स्थितीचीही पाहणी करण्यात आली. रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. रस्त्यावरील खराब भागांची तातडीने दुरुस्ती करून वाहतुकीसाठी रस्ता सुरक्षित व सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

चाकण परिसरातील वाढती औद्योगिक वाहतूक लक्षात घेता रस्त्यांची गुणवत्ता आणि वाहतूक व्यवस्थेतील अडथळे दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही यावेळी सांगण्यात आले.

पाहणीनंतर चाकण चौक येथे चाकण कृती समितीचे सदस्य, उद्योजक तसेच विविध औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधा तसेच कंपन्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत प्रतिनिधींनी आपली मते व अडचणी मांडल्या. उद्योग क्षेत्राच्या सुरळीत कामकाजासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांबाबत प्राप्त झालेल्या सूचनांची संबंधित विभागांच्या माध्यमातून दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

चाकण औद्योगिक क्षेत्र हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून, येथील उद्योग, कामगार आणि मालवाहतूक यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस आणि औद्योगिक संघटनांनी परस्पर समन्वयाने काम करण्यावर यावेळी भर देण्यात आला.